Monday, May 14, 2007

सराव

इथे कोण कधी कोणाचा होता
जो तो फक्त आपला एकट्याचा होता

रिकामा रिकामा प्याला वाटतो हा
दोष यात थरथरत्या हाताचा होता

कसा पाय जमिनीवर राहणार ठाम
मोह असा त्या एका क्षणाचा होता

सुख दुसर्‍याचे पाहवेना का त्यांना
बांधला जरी इमला कष्टाचा होता

मी धूर्त, मूर्ख, होतो कातडीबचाव, की
चुकला कोन तुमच्या बघण्याचा होता

मला सांगण्याची, वाटली लाज तुम्हा
धक्का इतका पुरेसा अपमानाचा होता

दुखर्‍या जखमांचे मला काय कौतूक
एकेक घाव आता सरावाचा होता


अभिजित...

Labels: ,

Wednesday, March 28, 2007

कशाचं काय अन् कशाचं काय

कशाचं काय अन् कशाचं काय
खेळाचा खंडोबा झालेला हाय

एक नाय अन् दोन नाय
समद्यांचीच् वाट लागलेली हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

हे काय रडं आजचं नाय
हारणं पाचवीला पुजलेलं हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

कागदी वाघांचे मातीचे पाय
रँपावर चालती ते मैदानावर नाय
कशाचं काय अन् कशाचं काय

बघणार्‍या लोकांना अक्कल नाय
आज वर चढवतील उद्या हाय हाय
कशाचं काय अन् कशाचं काय

अजूनसुदा सुधरायला चानस हाय
बांगला बरोबर सिरिज मे मधी हाय
कशाचं काय अन् कशाचं काय


अभिजित...

Labels:

Thursday, March 01, 2007

थांब ना जरा

मोहरला चाफा तू थांब ना जरा
अंधारल्या वाटा तू थांब ना जरा

मिठीतल्या फुला तू थांब ना जरा
वेगावला झुला तू थांब ना जरा

पाणावले डोळे तू थांब ना जरा
थरारले अंग तू थांब ना जरा

जाऊ नको अशी तू थांब ना जरा
झालो वेडापिसा तू थांब ना जरा

घे मलाही संगे तू थांब ना जरा
उद्या नाही पुन्हा तू थांब ना जरा


अभिजित...

Labels:

Friday, February 09, 2007

प्रेमांजली

मी कोण कुठला, मी नव्हतो कुणीही श्रेष्ठ
तुम्ही तुमच्या प्रेमाने केले अभिषिक्त मला

केली नव्हती अपेक्षा एवढ्या उदंड स्नेहाची
तुमच्या सहृदयतेने केले आजन्म कृतज्ञ मला

अवघड आहे दुनियेत असणे मित्र जिवाचे
ही निर्मिकाची कृपा भरभरुन दिधले मला

मी काय दिले म्हणून इतका आपलेपणा
रेशिमगाठी म्हणजे काय, कळले बहुधा मला

ही नाही कविता, ही होय अर्पण-पत्रिका
माझी हर एक निर्मिती आहे अर्पण तुम्हाला


अभिजित...

Labels:

Wednesday, February 07, 2007

सय

शब्द नाही आज माझी बोलती आसवे
थेंब थेंब सय तुझी डोळ्यांतून ओघळे

शक्य नाही ते तुला कायमचे विसरणे
क्षण देतील साद जे तुजसवे बहरले

मी अता शोधत नाही विरहाची कारणे
थांबवले आहे अता मी स्वत:ला कोसणे

नाही चालली काही मात्रा नियतीपुढे
झालो वेगळे तरी आहेत सांधलेली मने

तू ठेव अशीच आठवणीत जपून मला
राहो अंतापर्यंत अशाच अक्षय ह्या भावना


अभिजित...

Labels:

Saturday, September 23, 2006

अगतिक

का मलाच पोळतात हे निखारे
क्षणिक हासू, अनंत दु:खाचे धुमारे

का दाखवते मज मृगजळ सुखाचे
समजू कसे मी नियतीचे दुष्ट इशारे?

आशेत पहाटेच्या झिजला जन्म सारा
का न संपणारी मग ही निशा रे?

मुर्दाड झाले मन आता, तरी
का न थांबणारी ही वेदना रे?

पाठशिवणीचा खेळ अव्याहत चाले
का दैव हे सतत मजसंगे प्रतारे?

नेत्रांतून अश्रुंना खळ नाही
माझ्याच वाट्याला का भोग सारे?

अंत पाहे क्रूर नशिब माझे
हा गोंडस स्वप्नांचा चक्काचूर का रे?

अगतिक झाले मी, ही परीक्षा विखारी
माझ्या पापपुण्याचा चुकला हिशेब का रे?

अभिजित...

Labels:

Sunday, September 10, 2006

पुन्हा तू

तू गेलीस तेव्हा
फुले माझ्याजवळ रडली
मी जाऊ दिले म्हणून
माझ्यावरच चिडली

भासे तुझ्याविना
जग हे सुने सुने
भासे तुझ्याविना
शरीर काळजाउणे

डोळ्यांसमोर फ़क्त
तूच उभी असतेस
झाकले तर मात्र
श्वासांतून जाणवतेस

तु येण्याच्या आशेत
क्षण क्षण झुरतो आहे
तू जवळ नसल्याने
मी अर्धाच उरलो आहे.

अभिजित...

Labels:

Saturday, September 09, 2006

झेप

हे माकडांचे खेळ
नाहीत खेळवत आता
उत्तुंग झेप घेण्याची
लागली आस आता

नभ अपुरे पडती
दिशांना पडे मर्यादा
हेरल्या आता मी
क्लिष्ट रानवाटा

लक्ष्य आहे समोर
अन अढळ आत्मविश्वास
आता फ़क्त जिंकणे
हरण्याची कुणाला तमा

अभिजित...

Labels:

मी एकटाच

कुणी या न या मी एकटाच चाललो
आपुल्याच कैफ़ात मी झिंगलो

वाटल्या दाही दिशा मज मोकळ्या
निर्बंध मी आता कुणाचा न राहिलो

'वेड लागले' हवे तर म्हणा तुम्ही
मजपुरता तरी शाहणा मी जाहलो

काय? कुठे? प्रश्न नाही पडले कधी
मुक्त मी निरीच्छ आज भटकलो

साथ तुम्ही ना दिली जरी तरी
मी धुंद आज एकटाच गरजलो.

अभिजित....

Labels:

Monday, September 04, 2006

मी तुझी

अधिर मन अजूनच अधिर होते
आठवण तुझी जेव्हा फ़ेर धरून येते.

शब्दांचे अपुरेपण अधिकच जाणवते
पागल मी जेव्हा तुझे कौतुक करते.

भावनांचा कल्लोळ कशीबशी आवरते
माझी मीच वाहून जाते मीच मला सावरते.

असणे तुझे आसपास कायम जाणवते
मी मजसोबत जेव्हा एकटी असते.

तूझीच आहे मी हट्ट का धरतोस?
का सांगतोस मला तू मजवर प्रेम किती करतोस.

वेडा तू परवाना ज्योतीकडे झेप घेतोस
आशेत तू माझ्या मृत्यूला जवळ करतोस.

अभिजित...

Labels:

Friday, August 18, 2006

स्वातंत्र्य के नाम

पाऊस ओसरला की घोषणांचा महापूर
पुलांवरून पाणी आणि रस्त्यांवर खड्डे
खड्डयांमध्ये पडलिये जनता आम
घ्या एक जाम स्वातंत्र्य के नाम

तिजोरीतला खडखडाट संपलाय कधी ?
अनुशेषाचा प्रश्न सुटलाय कधी ?
'माहितीचा अधिकार' म्हटलं की फ़ुटतोय घाम
एक जाम स्वातंत्र्य के नाम

संसदेत गोंधळ की गोंधळात संसद ?
कामात घोटाळे की घोटाळयात काम ?
विकासाच्या घोडयाला भ्रष्टाचाराचा लगाम
होऊन जाऊद्या एक जाम स्वातंत्र्य के नाम

दोन दोन सेना दोन दोन कॉंग्रेस कशासाठी करता ?
'धर्मनिरपेक्ष' शब्द उरला निव्वळ युती करण्यापुरता
'कॉमन मॅन 'च्या जगण्यात नाही राहीला राम
घ्या एक जाम स्वातंत्र्य के नाम

आपलीच मते आणि आपलेच नेते
कोणाच्या नावाने मारताय बोंब ?
विश्वास नावाच्या शब्दाला नाही उरला दाम
सर्वात मोठ्या लोकशाहीला माझाही सलाम.

अभिजित...

Labels:

Sunday, August 06, 2006

सुर्यपुत्र

हे कडाडणाऱ्या विजांनो
घोंघावणाऱ्या वाऱ्यांनो
ऐका मी बोलतोय मी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

हिमालयासारखा माझा आत्मविश्वास आहे
निर्भय आहे मी अजिंक्य आहे
बांधले ना कस्पटांनी वाघाला कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

उडवीन दाणादाण रणी
मर्दून टाकीन अहंकार
नाही टिकले समोर कुणी एका क्षणावरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

ना दानात हरलो कधी
ना शौर्यात पडलो कमी
जिंकल्या चारी दिशा एकल्याच्या हिंमतीवरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

असलो सुर्याचा अंश, टाकले मातेने तरी
वाढलो सूताच्या घरी, पडली न माया कमी
निंदा सहली परी मती न फ़िरली कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

अभिजित...

Labels:

Thursday, August 03, 2006

कवितेवर कविता!!

कविता कधी मैत्रिण असते
सुख-दु:खांची सोबतिण असते,
आनंद तुमचा ती ही अनुभवते
तुमच्यावरचे घाव सोसते, अश्रू ढाळते.

कविता कधी बाप असते
परखड, रुक्ष आणि सख्तही असते,
शिस्तीच्या साच्यात वागते
खचलेल्यांना समर्थ आधार असते.

कविता कधी बहीण असते
नविन मैत्रिणी मिळवून देते,
कधी कान पकडते
तर कधी तुमची गुपितं लपवते.

कविता कधी आई असते
मायेची पखरण असते,
तुम्ही आणि अनंतातला
अदृश्य अनमोल दुवा असते,
कितीही मोठे झालात तरी
ती तुमची पहिली कविता असते.

अभिजित...

Labels:

Thursday, July 27, 2006

इतस्तत:

जुन्या काही जखमा अजूनही तशाच भळभळाव्या
अन लादलेल्या चुकांनी मन अजुनही जाळावं

काळजावर दगड ठेवून एखाद्याला हाक द्यावी
अन आपल्याच तत्त्वांना आपणच मुरड घालावी

मानापमान बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी
आणि आपल्याच विवेकबुद्धीचा आपणास संशय यावा

समंजसपणा म्हणावा की माघार म्हणावी?
नाहीतर आपल्याच पुढाकाराचं हकनाक हसं व्हावं

अस्तंगत होताना शेवटचा म्हणून दिवा मोठा व्हावा
अन त्या मोठेपणाचा अर्थ त्यालाच न कळावा.


-अभिजित...

Labels:

Wednesday, May 31, 2006

पाऊस

कालचा पाऊस असा बेभान होऊन बरसला...
मनसोक्त स्वच्छंद क्षितीजावर उतरला
सगळ्यांना वेड लावत मॄद-गंध दरवळला
रोमारोमांतून नसानसांतून वसंत मोहोरला

-अभिजित

Labels:

Friday, May 05, 2006

चाहूल-२

घण घण घण गरजत घन आले दाटुनिया..
सर सर सर सरसावून सरी आल्या धावुनिया..
अवखळ अबलख वारा बेफ़ाम होऊनिया....
उडवी ओढणी माझी टाके भिववूनिया..

धीर कसा धरू मी कुणी नाही आधाराला
गेला कुठे सजना टाकुन मज एकटीला
संध्या ही सरत आली हाक मारु कुणाला
लखलख वीज चमकुन गेली काळीज भेदुनिया

शहारले अंग सारे धडधड काही थांबेना
पावसाच्या धाकाचा अंत काही दिसेना
चंचल मन हेलावुन साद देई सख्याला
थकले थिजले शरीर गेले मरगळुनिया

उंबऱ्यावर हळुवार त्याची पाऊले वाजली..
चटकन कशी काय सगळी घालमेल थांबली..
हरखुनि दिला देह सारा त्या हाती लोटुनिया..
पाही खिडकीतून अवघा आसमंत थबकुनिया..

Labels:

Friday, March 03, 2006

तू




Click on Image to enlarge..
photo courtesy: Viraj Paripatyadar aka MAMOO

Abhijit

Labels:

Friday, February 24, 2006

बंध

ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याला
बंध घातले आहेत..
वास्तव आयुष्यचे
मला आता समजत आहे...

नियतीच्या हातात आता
सगळे दोर आहेत...
मी स्वच्छंदी होऊन
दिशाहीन भटकत आहे.

आता कुठे मी स्वत:ला सावरत आहे..
वाट तुझ्या परतीची पाहत आहे
गेली आहेस तू खूप दूर..
पण सावली तूझी माझ्या मनात तशीच आहे..

-अभिजित

Labels:

Saturday, February 18, 2006

चाहूल

संध्याकाळ झाली..
कुठे गेलं पाखरु
हुरहूर लागे जीवा
माय वाट पाही..

तिन्हीसांजेच्या वेळी
घरट्याच्या दारावरी..
अधीर झाली
हैराण चिमणी..

कशी धावत आली..
अंधाराची सावली..
माझं लाडकं लेकरु..
अजून दिसत नाही..

पायवाटेवरची
धूळ खाली बसली
द्वाड सोनूल्याची
चाहूल लागली..

हरखून गेली..
यशोदेची प्रीतं.
बाळ पंखाखाली
विसावला..

-- अभिजित

Labels:

Saturday, February 04, 2006

दीपस्तंभ

वादळातल्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग मला दाखवतेस
एक लाट तोडी दोघा पुन्हा निघून जातेस

आजच्या जगात सगळं दिसतं सगळं मोजता येतं
तुझ्या माझ्यावरच्या प्रेमा्ला कोणत्या तराजुत तोलु

राहून राहून हजारवेळा तुझीच आठवण येते
आरशात पाहीले तरी तुझीच प्रतिमा दिसते

स्वत:ला विसरण्यासाठी स्वत:च उपाय सांगतेस
तुझी आठवण न येता जीवंत कसा राहू

व्यर्थ जाहली मजसाठी सर्व नाती
तुझ्या मुळे सर्व नात्यांना अर्थ आला

शेवटपर्यंत तुझा म्हणून राह्ण्याचे वचन दिले आहे तुला
ह्या वचनापासून मागे कसा फ़िरुन जाऊ

खरे सांगू तुझ्या विना जगणे होइल कठीण
तरीसुद्धा मनात एकमेकांच्या सदैव आपण राहु

---आभिजित

Labels: