Wednesday, October 17, 2007

नशिब

आभाळ फाटल्यागत पाऊस पडत होता. डोळं उघडायला सुदा सवड देत नव्हता. आणि तसल्या पावसात मधुआण्णा सायकल दामटीत उंब्रजला निघाला होता. उगंच एक हात डोळ्यावर धरून रस्त्याचा अंदाज घेताना उलट्या बाजूनं कुणीतरी वळखीचं चालल्यागत वाटलं तशी त्यानं हाक दिली, "आरं ए संपा कुठं निघालायंस रं?". दुसर्‍या बाजूनं सायकलवर मुंडकं खाली घालून तराट चालल्याला संपा कसाबसा ब्रेक लावून थांबला. आणि तेवढ्यात त्याच्या अगदी समोर धाडकन झाड कोसळल्याचा आवाज झाला. हबकलेल्या संपानं मान वळवून देवागत धावलेल्या आण्णाकडं बघितलं. संपाच्या डोळ्यातनं पाण्याचे वघळ खाली येऊन पावसाच्या धारेत मिसळून जाऊ लागले.



अभिजित

Labels:

Friday, May 04, 2007

माणूस लिहितो कशासाठी?

माणूस लिहितो कशासाठी? एक स्वतःसाठी. दोन सगळयांसाठी. पूर्णपणे स्वतःसाठी ते असतं जे त्याच्या मनात दाटत असतं, तो गुदमरत असतो आणि असह्य होतं म्हणून ते व्यक्त करण्यासाठी तो लिहितो. या लिखाणाची त्याला प्रतिक्रिया वाचकांकडून आली नाही आली, चांगली मिळाली नाही मिळाली काही फरक पडत नाही. कारण कुणीतरी वाचावं म्हणून ते लिहिलेलंच नसतं. दुसरं सगळ्यांसाठी म्हणजे मित्रपरिवार, जवळचे लोक आणि अनोळखी वाचक यांसाठी ते लिखाण असतं ज्यावर मिळालेल्या प्रतिक्रियेने लेखक सुखावतो किंवा दुखावतो. म्हणजे जशी प्रतिक्रिया येते तसं. माझ्याही लेखांच्या, कवितांच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतात. चांगलं लिहिण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी. असं लिहितानाच मुळी प्रतिक्रियांचा किंवा वाचकांना भिडावं आवडावं असं लिहिण्याचा प्रयत्न असतो. आणि भाषेत वाक्प्रचार, अलंकार हे यथायोग्य पणे आपल्या भावना शब्दात मांडता याव्यात यासाठीच असतात.

कुणी तरी म्हटलं आहेच की जो कवी असं म्हणतो की मी फक्त स्वतःसाठी लिहितो तो कुठेतरी स्वतःशी प्रतारणा करत असतो. कारण तुम्ही एकदा तुमचं साहित्य जनतेसमोर किंवा मित्रांसमोर आणलं की चांगलं लिहीत राहण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर येतंच. उस्फूर्त साहित्याला थोडया वास्तवतेच्या भानाची जोड दिली की वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणं शक्य होतं. तुमची कविता त्याला त्याचीच कहाणी वाटू लागते. तीच तुमची दाद असते आणि पोचपावतीही. सुजाण रसिकांच्या काळजाला हात घालणं कुणाला इतकं सोप्पं वाटत असेल तर ते चूक आहे. आणि त्याच वेळी आपलं लेखन सगळ्यांनाच आवडेल असं वाटणंही चूक आहे. कारण त्यात वाचकाच्या आवडीनिवडीचाही भाग असतोच की. तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला सुचेल तेच लिहून वाचकांच ॠण फेडणं यात लेखकाच्या लेखनाच सार्थक आहे. अपेक्षा वाढतात हे खरंच आहे पण अपेक्षा निर्माण केल्यावर त्या पूर्ण करायला नकोत का? अता तुम्ही म्हणाल की मग असं सारखं तोच दर्जा टिकवणं कसं जमेल? यावर थांबणे हा उपाय आहे. जोपर्यंत दमदार आणि कमीत कमी स्वतःला (मनापासून) आवडेल असं काही सुचत नाही तोपर्यंत थांबावं. सुरेश भट ज्याला थांबता येत नाही तो खरा कवी नव्हे म्हणतात ते यासाठीच. कारण नाहीतर तुम्ही अपेक्षांच्या पुरात वाहून जाल. तुम्हीही आणि तुमचे लेखनही.



अभिजित...

Labels: ,

Wednesday, January 03, 2007

दोन पोपट

परवा मी मुंबईला माझ्या मित्राबरोबर म्हणजे हेमंत बरोबर भटकत होतो. संध्याकाळची वेळ होती आणि मला थ्री-फ़ोर्थ विकत घेण्याची हुक्की आली.
बाजूला स्टॉल होतेच. मांडून ठेवलेल्या थ्री-फ़ोर्थच्या गठ्ठ्यातून मी माझ्यासाठी एक शोधत होतो. बऱ्याच परीक्षणानंतर मी एक थ्री-फ़ोर्थ पसंत केली.
तसा तो विकणारा माणूस म्हणाला," तुम्हाला नाही यायची ही". आणि वरून हेमंतकडे बोट करून "पण ह्यांना बसेल बरोबर." च्यायला. केला पोपट.

***
एकदा कराडला मी आणि माझा भाऊ सहज कपडे खरेदी साठी बाहेर पडलो. शर्ट वगैरे घेतला. म्हटलं आलोच आहोत तर अंदर की बात अंडरविअर ही घ्यावी.
दोघांना एक-एक अशा दोन ८५च्या अंडरविअर मागितल्या. दुकानदार सेड, "तुम्हाला ९० ची लागेल." परत पोपट.

Labels:

Sunday, September 10, 2006

मी सायकल शिकतो.

माझ्या सायकल शिकण्याची कहाणी संवाद रुपाने लिहायची हुक्की आली. यत्ता आठवी मध्ये मी सायकल शिकलो. यथाकाल त्यात 'हात सोडुन चालवणे', 'ब्रेक न लावता घरापासुन क्लासपर्यंत जाणे', 'पुढचं चाक उचलून सायकल चालवणे' अशी value addition होत राहिली. पण सायकल शिकेपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय झाला.
.......................................................................

"बबलू, सायकल शिकून घे तेवढी.", इति मातोश्री

मी, "................"

वडील, "आता गावात क्लासला जायला लागेल. "

"हट मर्दा, ती कलमाड्यांची गुड्डी सुद्धा शिकली. ऎकतोयस का नाही मुकाट्यानं?", मासाहेब कडाडल्या आणि अस्मादिकांच्या कानात तुताऱ्या वाजु लागल्या. याला उत्तेजना म्हणावी की तेजोभंग हे अजुनही समजत नाही.

नानासाहेब (म्हणजे पिताश्री): "गवत्यांच्या दुकानातनं घ्यायची भाड्यानं. तासावर. शिकलास की नवीन घेऊन देतो."

मग अभिजित, इंद्रजित आणि संजय, विजय (आमचे शेजारी) अशा राम-लक्ष्मणाच्या दोन जोड्या सायकल शिक्षण मोहिमेवर निघाल्या.

"आधी हॉप्पिंग करायला शिक.", कुणीतरी म्हटलं.

"सोडू नको रे कॅरेज."

"धाऽऽऽऽऽऽड!!!!!!!!!!"

"...................."

"सोडलवतंस वंय?"

"सायकलला काय झालं नाय ना? चेन पडली...डेंजर पण तुटलाय."

"मागचं चाक उलटं फ़िरव मग बसंल." सूज्ञ सल्ला.

"हा..बसली. च्यायला हात काळं झालं."

दुसरा दिवस:

"नळीवरनं पाय टाकून बस."

"मागनं यतंय का बघुया."

"थाऽऽड. कॅरेजला पाय थटला. "

हळू हळू मग बॅलन्स जमायला लागला.

आणि मग:

"एऽऽऽ बघे.. ढिंच्याक! ढिढिंच्याक!!! "

"शर्यत लावतूस का?"

"चल. ग्राउंडला एक राउंड मारायचा."

घरी आलो:

"बघा नाना, मी सायकल चालवायला शिकलो."

"द्या ओ त्याला नविन सायकल घेउन." मासाहेबांनी हर्ष व्यक्त केला.

"घेउन टाकू. हर्क्युलस. २२ इंची."

"हेऽऽऽऽऽऽऽ"

.......................................................................

पुन्हा दोन वर्षांनी.....
"बबलू, गाडी शिक तेवढी आता. मला शाळेत सोडायलाय येशिल मग."

मी, "..........................."

Labels: