Tuesday, August 22, 2006

माझी आवडती गजल

ही गजल मला ओढ लावते. वेडं करून टाकते. पहा तुम्हालाही आवडेल..
....
तुझ्या डोळ्यांमध्ये गहीऱ्या असा मी हिंडतो आहे
जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे.

तुला सोडुनी जाण्याची मला चिंता आता नाही
तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे.

तिथे बोलायला जाऊ जिथे ना एकटे राहू
इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे.

तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू
असे समजू नको तू की तुला मी टाळतो आहे.

-चंद्रशेखर सानेकर.
......
जर तुम्हाला ऐकायची असेल तर:
"एका उन्हाची कैफियत"
गायिका: पद्मजा फेणाणी
संगीत: मयूर पै
Fountain Music Company

Labels:

Saturday, August 19, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

मला ह्या खेळात मिलिंद ने सामील करून घेतले. त्याबद्दल त्याचा आभारी आहे.

खेळाविषयी अधिक माहिती करता हे पहा :

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक:
  • 'आमचा बाप आणि आम्ही' ,नरेन्द्र जाधव.

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती:

  • Management शिकायला IIMA मध्येच गेले पहिजे असे नाही. नरेंद्र जाधव यांचे अडाणी वडील त्यांच्या मुलांसाठी प्रेरणास्त्रोत कसे बनतात याचे सुबक/यथार्थ वर्णन या पुस्तकात केले आहे. प्रश्न असा पडतो की न शिकलेल्यांना अडाणी म्हणायचे की सुशिक्षितपणाचा बुरखा पांघरलेल्या उच्चशिक्षितांना?
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) पुस्तके:
  • कार्यरत:अनिल अवचट
  • मृत्युंजय :शिवाजी सावंत
  • महानायक : विश्वास पाटील
  • फकीरा : अण्णा भाऊ साठे
  • सप्तरंग, रूपगंधा : सुरेश भट
  • झोंबी,नांगरणी, काचवेल : आनंद यादव
  • अनेक कथासंग्रह: वपु काळे, शंकर पाटील, द. मा., गदिमा, व्यंकटेश माडगुळकर

४. अद्याप वाचायची आहेत अशी पुस्तके:

  • तसा आता वाचनाचा धडाका कमी झालाय. नविन लेखकांची नविन पुस्तके वाचायची आहेत. तसेच आत्मचरित्रे वाचायची आहेत. 'मृत्युंजय' परत वाचायची आहे. ग्रेस यांच्या कविता समजून घ्यायच्यायत.


५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे:

  • तशी 'मृत्युंजय' आणि 'फकीरा' ही माझी सर्वात आवडती पुस्तके आहेत. सध्या मात्र फकीराबद्दल सांगतो. अण्णांची कादंबरीचा वेग आणि वेगावरची पकड जबरदस्त आहे. विशेषणे आणि ग्रामीण भाषेचा वापर अत्यंत चपखलपणे केला आहे. बारीकसारीक गोष्टींमधून वास्तव उभे केले आहे. लिहील तितके कमीच आहे. एकदा वाचूनच बघा.

    ह्या खेळात सहभागी व्हायला कोणी बोलवायची वाट बघू नका. चला लिहा, सुरु करा. असं समजा की मी तुम्हालाच आमंत्रित केले आहे.

Labels:

Friday, August 18, 2006

स्वातंत्र्य के नाम

पाऊस ओसरला की घोषणांचा महापूर
पुलांवरून पाणी आणि रस्त्यांवर खड्डे
खड्डयांमध्ये पडलिये जनता आम
घ्या एक जाम स्वातंत्र्य के नाम

तिजोरीतला खडखडाट संपलाय कधी ?
अनुशेषाचा प्रश्न सुटलाय कधी ?
'माहितीचा अधिकार' म्हटलं की फ़ुटतोय घाम
एक जाम स्वातंत्र्य के नाम

संसदेत गोंधळ की गोंधळात संसद ?
कामात घोटाळे की घोटाळयात काम ?
विकासाच्या घोडयाला भ्रष्टाचाराचा लगाम
होऊन जाऊद्या एक जाम स्वातंत्र्य के नाम

दोन दोन सेना दोन दोन कॉंग्रेस कशासाठी करता ?
'धर्मनिरपेक्ष' शब्द उरला निव्वळ युती करण्यापुरता
'कॉमन मॅन 'च्या जगण्यात नाही राहीला राम
घ्या एक जाम स्वातंत्र्य के नाम

आपलीच मते आणि आपलेच नेते
कोणाच्या नावाने मारताय बोंब ?
विश्वास नावाच्या शब्दाला नाही उरला दाम
सर्वात मोठ्या लोकशाहीला माझाही सलाम.

अभिजित...

Labels:

श्रावणखेळ

उन पावसाचा खेळ
श्रावणात बहरतो
आधी उन जिंकायचं
आता पाऊस जिंकतो.

अभिजित...

Labels:

Wednesday, August 16, 2006

द्व-शब्दोळी

देह माझा भान तुझे
श्वास माझा प्राण तुझे
मन माझे ध्यान तुझे
शब्द माझे काव्य तुझे

अभिजित...

Labels:

Sunday, August 06, 2006

सुर्यपुत्र

हे कडाडणाऱ्या विजांनो
घोंघावणाऱ्या वाऱ्यांनो
ऐका मी बोलतोय मी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

हिमालयासारखा माझा आत्मविश्वास आहे
निर्भय आहे मी अजिंक्य आहे
बांधले ना कस्पटांनी वाघाला कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

उडवीन दाणादाण रणी
मर्दून टाकीन अहंकार
नाही टिकले समोर कुणी एका क्षणावरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

ना दानात हरलो कधी
ना शौर्यात पडलो कमी
जिंकल्या चारी दिशा एकल्याच्या हिंमतीवरी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

असलो सुर्याचा अंश, टाकले मातेने तरी
वाढलो सूताच्या घरी, पडली न माया कमी
निंदा सहली परी मती न फ़िरली कधी
कर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.

अभिजित...

Labels:

Thursday, August 03, 2006

कवितेवर कविता!!

कविता कधी मैत्रिण असते
सुख-दु:खांची सोबतिण असते,
आनंद तुमचा ती ही अनुभवते
तुमच्यावरचे घाव सोसते, अश्रू ढाळते.

कविता कधी बाप असते
परखड, रुक्ष आणि सख्तही असते,
शिस्तीच्या साच्यात वागते
खचलेल्यांना समर्थ आधार असते.

कविता कधी बहीण असते
नविन मैत्रिणी मिळवून देते,
कधी कान पकडते
तर कधी तुमची गुपितं लपवते.

कविता कधी आई असते
मायेची पखरण असते,
तुम्ही आणि अनंतातला
अदृश्य अनमोल दुवा असते,
कितीही मोठे झालात तरी
ती तुमची पहिली कविता असते.

अभिजित...

Labels: