Thursday, September 28, 2006

अर्धा मी अन अर्धी तू

एकाच छत्रीत, अर्धा मी अन अर्धी तू
भिजलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू

चिंब पावसाच्या सरी बरसल्या
शहारलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू

कोसळत्या पावसात निर्जन वाटेवर
हरवलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू

निनादली दामिनी, कडाडले ढग
घाबरलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू

वाफ़ाळत्या चहाचा हिंदकळता कप
गारठलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू

पावसाची रिपरिप, पानांची सळसळ
मोहरलो मात्र, अर्धा मी अन अर्धी तू.


अभिजित.....

Labels:

Wednesday, September 27, 2006

चंद्रिका मनामधी भरली

पाहता चंद्रिके तुला मी मजला विसरून गेलो
स्वप्नाळू डोळ्यांत तुझ्या मी अलगद उतरून गेलो

हटता न हटे तसबीर मजसमोरुन तुझी
पुलकित आभास तुझा, मी क्षणभर मोहरून गेलो

लावे वेड जीवा मनमोहिनी हास्य तुझे
तुझ्या हसण्यात जणू, मी मला हरवून गेलो

अल्लड चेहऱ्यावर तुझ्या कसली ही उत्सुकता
मी प्रियकर तुझा, क्षणभर मज समजून गेलो

सांगता काही अशी, लाजून का गेलीस तू?
मोकळ्या भाळी तुझ्या, मी मला निरखून गेलो

मृगजळी अस्तित्व तुझे जाणतो मी जरी
चाहूलीने नुसत्या तुझ्या, आज मी हरखून गेलो.

अभिजित....

Labels:

Saturday, September 23, 2006

अगतिक

का मलाच पोळतात हे निखारे
क्षणिक हासू, अनंत दु:खाचे धुमारे

का दाखवते मज मृगजळ सुखाचे
समजू कसे मी नियतीचे दुष्ट इशारे?

आशेत पहाटेच्या झिजला जन्म सारा
का न संपणारी मग ही निशा रे?

मुर्दाड झाले मन आता, तरी
का न थांबणारी ही वेदना रे?

पाठशिवणीचा खेळ अव्याहत चाले
का दैव हे सतत मजसंगे प्रतारे?

नेत्रांतून अश्रुंना खळ नाही
माझ्याच वाट्याला का भोग सारे?

अंत पाहे क्रूर नशिब माझे
हा गोंडस स्वप्नांचा चक्काचूर का रे?

अगतिक झाले मी, ही परीक्षा विखारी
माझ्या पापपुण्याचा चुकला हिशेब का रे?

अभिजित...

Labels:

Monday, September 18, 2006

या एकांती

या एकांती स्वप्न दिसले मला
या एकांती विश्व गवसले मला

शोधले फ़ुकाच स्वत्व: दाहीदिशा
या एकांती येऊनी बिलगले मला

कल्लोळ श्वापदांचा अहोरात्र चालला
या एकांती शांतपण लाभले मला

यंत्रांच्या दुनियेत माणूस(पण) हरवला(ले)
या एकांती हे ही जाणवले मला

मी मला एकटा म्हणू कसा?
या एकांती कवितेने कवळले मला.

अभिजित...

Labels:

Wednesday, September 13, 2006

दास चरणीचा तुझ्या

धुंद या रात्री अशा, गंध केसांचा तुझ्या
उठते पहाट ऐकुनी नाद पैजणांचा तुझ्या

रुळते बट गालावरी, विस्कटला भांग तुझा
करतो घायाळ मला शर नयनांचा तुझ्या

मृदू सिंहकटी, चाल गजगामिनी तुझी
वाटतो हवाहवासा मज पाश बाहूंचा तुझ्या

उतरो न नशा ही पागल मिठीची तुझ्या
पाजून टाक जाम मत्त ओठांचा तुझ्या

हरलो मी स्वत्व तुझ्यात, झाली 'जीत' तुझी
बनवून टाक मला दास चरणीचा तुझ्या

अभिजित...

Labels:

Sunday, September 10, 2006

मी सायकल शिकतो.

माझ्या सायकल शिकण्याची कहाणी संवाद रुपाने लिहायची हुक्की आली. यत्ता आठवी मध्ये मी सायकल शिकलो. यथाकाल त्यात 'हात सोडुन चालवणे', 'ब्रेक न लावता घरापासुन क्लासपर्यंत जाणे', 'पुढचं चाक उचलून सायकल चालवणे' अशी value addition होत राहिली. पण सायकल शिकेपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय झाला.
.......................................................................

"बबलू, सायकल शिकून घे तेवढी.", इति मातोश्री

मी, "................"

वडील, "आता गावात क्लासला जायला लागेल. "

"हट मर्दा, ती कलमाड्यांची गुड्डी सुद्धा शिकली. ऎकतोयस का नाही मुकाट्यानं?", मासाहेब कडाडल्या आणि अस्मादिकांच्या कानात तुताऱ्या वाजु लागल्या. याला उत्तेजना म्हणावी की तेजोभंग हे अजुनही समजत नाही.

नानासाहेब (म्हणजे पिताश्री): "गवत्यांच्या दुकानातनं घ्यायची भाड्यानं. तासावर. शिकलास की नवीन घेऊन देतो."

मग अभिजित, इंद्रजित आणि संजय, विजय (आमचे शेजारी) अशा राम-लक्ष्मणाच्या दोन जोड्या सायकल शिक्षण मोहिमेवर निघाल्या.

"आधी हॉप्पिंग करायला शिक.", कुणीतरी म्हटलं.

"सोडू नको रे कॅरेज."

"धाऽऽऽऽऽऽड!!!!!!!!!!"

"...................."

"सोडलवतंस वंय?"

"सायकलला काय झालं नाय ना? चेन पडली...डेंजर पण तुटलाय."

"मागचं चाक उलटं फ़िरव मग बसंल." सूज्ञ सल्ला.

"हा..बसली. च्यायला हात काळं झालं."

दुसरा दिवस:

"नळीवरनं पाय टाकून बस."

"मागनं यतंय का बघुया."

"थाऽऽड. कॅरेजला पाय थटला. "

हळू हळू मग बॅलन्स जमायला लागला.

आणि मग:

"एऽऽऽ बघे.. ढिंच्याक! ढिढिंच्याक!!! "

"शर्यत लावतूस का?"

"चल. ग्राउंडला एक राउंड मारायचा."

घरी आलो:

"बघा नाना, मी सायकल चालवायला शिकलो."

"द्या ओ त्याला नविन सायकल घेउन." मासाहेबांनी हर्ष व्यक्त केला.

"घेउन टाकू. हर्क्युलस. २२ इंची."

"हेऽऽऽऽऽऽऽ"

.......................................................................

पुन्हा दोन वर्षांनी.....
"बबलू, गाडी शिक तेवढी आता. मला शाळेत सोडायलाय येशिल मग."

मी, "..........................."

Labels:

पुन्हा तू

तू गेलीस तेव्हा
फुले माझ्याजवळ रडली
मी जाऊ दिले म्हणून
माझ्यावरच चिडली

भासे तुझ्याविना
जग हे सुने सुने
भासे तुझ्याविना
शरीर काळजाउणे

डोळ्यांसमोर फ़क्त
तूच उभी असतेस
झाकले तर मात्र
श्वासांतून जाणवतेस

तु येण्याच्या आशेत
क्षण क्षण झुरतो आहे
तू जवळ नसल्याने
मी अर्धाच उरलो आहे.

अभिजित...

Labels:

Saturday, September 09, 2006

झेप

हे माकडांचे खेळ
नाहीत खेळवत आता
उत्तुंग झेप घेण्याची
लागली आस आता

नभ अपुरे पडती
दिशांना पडे मर्यादा
हेरल्या आता मी
क्लिष्ट रानवाटा

लक्ष्य आहे समोर
अन अढळ आत्मविश्वास
आता फ़क्त जिंकणे
हरण्याची कुणाला तमा

अभिजित...

Labels:

मी एकटाच

कुणी या न या मी एकटाच चाललो
आपुल्याच कैफ़ात मी झिंगलो

वाटल्या दाही दिशा मज मोकळ्या
निर्बंध मी आता कुणाचा न राहिलो

'वेड लागले' हवे तर म्हणा तुम्ही
मजपुरता तरी शाहणा मी जाहलो

काय? कुठे? प्रश्न नाही पडले कधी
मुक्त मी निरीच्छ आज भटकलो

साथ तुम्ही ना दिली जरी तरी
मी धुंद आज एकटाच गरजलो.

अभिजित....

Labels:

Monday, September 04, 2006

मी तुझी

अधिर मन अजूनच अधिर होते
आठवण तुझी जेव्हा फ़ेर धरून येते.

शब्दांचे अपुरेपण अधिकच जाणवते
पागल मी जेव्हा तुझे कौतुक करते.

भावनांचा कल्लोळ कशीबशी आवरते
माझी मीच वाहून जाते मीच मला सावरते.

असणे तुझे आसपास कायम जाणवते
मी मजसोबत जेव्हा एकटी असते.

तूझीच आहे मी हट्ट का धरतोस?
का सांगतोस मला तू मजवर प्रेम किती करतोस.

वेडा तू परवाना ज्योतीकडे झेप घेतोस
आशेत तू माझ्या मृत्यूला जवळ करतोस.

अभिजित...

Labels: