Wednesday, October 11, 2006

झुंज

तोडा त्या श्रृंखला फेका ही बंधने
उठूद्या झुंजार ज्वाला पेटवा तुमची तने

प्रेषितांची वाट बघण्या वेळ नाही आता
तुमचे शब्द सूक्ते अन् आयुष्य दाखला बने

ढेकळापरी मातीच्या फुटतील कारागृहे
जाणवू द्या त्यांनाही हृदयातील स्पंदने

कुत्सित जन हसतील म्हणतील, "हे कोण?"
अनलाने दिली न ओळख जाळली नुसती वने

बक्षिसापरी झेलुया घाव हे पदोपदी
ध्येयावर निष्ठा हे मलम तुला वेदने

कूपात सडणाऱ्यांचा खच हा इतस्तत:
यातनामुक्ती द्याया तुला आलो हे अवने

स्वागतास तुमच्या वाजतील सनई-चौघडे
सिद्ध व्हा साद द्या प्याऱ्या युद्धगर्जने

गोंजारणार कुठवर ही षंढ उद्विग्नता?
विश्व'जित' आहा तुम्ही चेतवा तुमची मने


अभिजित....

Labels:

Saturday, October 07, 2006

कीर्ती

या सुन्या घरट्याची तुला खंत का रे?
झाली पिले मोठी, हा होय अंत का रे?

विजयात तुम्ही त्यांच्या फुंकल्या तुताऱ्या
हार दोन घालून, झाले ते महंत का रे?

हे फुकाचे ज्ञान पाजती सर्व जगाला
घेती टाळ्या यांना, म्हणू मी संत का रे?

लुटती जनतेला हे बाबू आणि मंत्री
लाटल्या देणग्या ज्यांनी, ते हे पंत का रे?

मंथरेचे दास हे, हे शकुनीचे पाईक
या थोर भुरट्यांची, कीर्ती दिगंत का रे?

'जीत' आहे हीन, अन अर्थहीन कवतिके
या निष्पाप धरणीची, दु:खे अनंत का रे?


अभिजित.....

Labels: