Friday, November 27, 2015

कट्यार काळजात घुसली

आज मी कट्यार काळजात घुसली पुन्हा पाहिला. पहिल्या वेळी पाहिला तेव्हा एक अद्भुत कलाकृती अनुभवल्याचा आनंद झाला होता. मन प्रसन्न झालं झालेलं होतं.  पण खासाहेबांसारखी एक प्यास मनात जागली आणि तेव्हाच ठरवलं अजून एकदा नक्की पाहायचा. पहिल्या वेळेचा रोमांच ओसरल्यानंतरसुद्धा हा चित्रपट तेवढाच अतुलनीय वाटतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न आधी झाले नाहीत असे नाही परंतु 'या सम हाच'.

जसे संगीत तसेच चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक या चित्रपटाचा आत्मा आहेत. या सर्वांचे स्वत:चे असे खास व्यक्तित्व आहे. बरीच वर्षे या क्षेत्रात असल्यामुळे आपली शैली आहे. परंतु त्या शैलीच्या चौकटीबाहेर पडून एक अप्रतिम नजराणा त्यांनी आपल्यासमोर पेश केला आहे. दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेचा हा पहिलाच चित्रपट. अभिनेता म्हणून शंकर महादेवनचा हा पहिलाच चित्रपट. अमृता खानविलकर आणि मृण्मयीला अभिनेत्री म्हणून प्रामाणिक संधी देणारा हा पहिलाच चित्रपट. सचिन म्हणून सचिन बद्दल असलेल्या पूर्वग्रहांना छेद देणारा हा पहिलाच चित्रपट. या सर्वानी जीवाचं रान केलं आहे आणि संधीचं सोनं केलं आहे. चित्रपटाशी संबंधीत असलेल्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण क्षमतेनं आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. सर्वोत्तम कलाकृती घडवायची हा निर्धार सुरुवातीपासून असल्याशिवाय हे शक्य नाही.

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली तीन पात्रे सतत अधिकाधिक सशक्तपणे आपल्यासमोर येत राहतात. खासाहेबांच्या दाहक गायकी बरोबरच पंडितजींची सुमधुर तान मनाचा ठाव घेते. आणि या दोहोंचा मिलाफ असलेली  सदाशिवची स्वत:चा ठसा असलेली गायकी.  शास्त्रीय संगीतातलं ओ  की ठो कळत नसलेल्या माझ्या सारख्या अजाण रसिकालासुद्धा तीन प्रकारच्या गानकलेचा पूर्ण आस्वाद घेता येतो ही दिग्दर्शकाची किमया. हेच नाटक २०१० साली जेव्हा आलं होतं तेव्हा आपल्याला काही कळत नाही म्हणून पाहिलं नव्हतं. एकाच  वेळी  सर्व गायक उच्च दर्जाचे असतानाही  कोण जिंकतंय कोण  हरतय हे सर्वसामान्य रसिकालाही मूर्ख न बनवता समजावून दाखवताना सुबोधला आलेले यश निर्विवाद आहे. भले आम्हाला हरकती वगैरे नेमक्या समजल्या नसतील पण चित्रपट दुर्बोध नक्कीच नाही. उलट मधुसेवनात दंग झालेल्या भ्रमराप्रमाणे प्रेक्षक तल्लीन होतात. संगीत जगणं म्हणजे काय हे या चित्रपटातून समजतं.

मला हा चित्रपट आवडण्याची अनेक कारणे आहेत. एक ध्येय्य लक्षात ठेवून त्यासाठी अशक्य ते शक्य  करून दाखवले आहे.  ते करताना चित्रपटाचा आत्मा असलेल्या कलेच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. सचिनसारख्या बहुगुणी कलाकाराकडून कोणताही अतिरेक होऊ न देता आपल्याला हवे तसे काम करून घेतले आहे. कलाकारांनी व्यावसायिक दृष्टिकोन  ठेवतानाच जीव ओतून काम केले आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू  (जसे रंगभूषा, वेशभूषा ) यामध्ये  कुठल्याही प्रकारची हेळसांड नाही. चित्रपटाचा एकंदर अनुभव समृद्ध करणारे छायाचित्रण, नृत्य, पार्श्वसंगीत, संवाद लेखन, गीतलेखन यात वाखाणण्यासारखी गुणवत्ता आहे.

हा चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे पण प्राचीन भारतात कला क्षेत्रात असलेले वैविद्ध्य आणि वैश्विक परिमाण लक्षात येण्यासाठी हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरतो. कलाकारापेक्षा कला श्रेष्ठ आहे आणि  ही कला संस्कृती कोणत्याही घराण्याची मालमत्ता नाही. उलट संगीत वेगवेगळ्या घराण्यांचे संस्कार होऊन अधिक प्रभावी आणि श्रवणीय बनते. भारतीय शास्त्रीय  संगीत परंपरेचा सार्थ अभिमान वाटावा हा उद्देश मनात ठेवून निर्मिलेला हा चित्रपट नक्कीच ठेवा म्हणून जतन करावा असा आहे . सुबोध भावे आणि या चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. अजूनही तुम्ही पहिला नसाल तर नक्की  पहा. ही कट्यार काळजात घुसल्याशिवाय राहत नाही.

--अभिजित यादव

PS: https://en.wikipedia.org/wiki/Katyar_Kaljat_Ghusali_(film)

Labels: