Friday, May 04, 2007

माणूस लिहितो कशासाठी?

माणूस लिहितो कशासाठी? एक स्वतःसाठी. दोन सगळयांसाठी. पूर्णपणे स्वतःसाठी ते असतं जे त्याच्या मनात दाटत असतं, तो गुदमरत असतो आणि असह्य होतं म्हणून ते व्यक्त करण्यासाठी तो लिहितो. या लिखाणाची त्याला प्रतिक्रिया वाचकांकडून आली नाही आली, चांगली मिळाली नाही मिळाली काही फरक पडत नाही. कारण कुणीतरी वाचावं म्हणून ते लिहिलेलंच नसतं. दुसरं सगळ्यांसाठी म्हणजे मित्रपरिवार, जवळचे लोक आणि अनोळखी वाचक यांसाठी ते लिखाण असतं ज्यावर मिळालेल्या प्रतिक्रियेने लेखक सुखावतो किंवा दुखावतो. म्हणजे जशी प्रतिक्रिया येते तसं. माझ्याही लेखांच्या, कवितांच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतात. चांगलं लिहिण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी. असं लिहितानाच मुळी प्रतिक्रियांचा किंवा वाचकांना भिडावं आवडावं असं लिहिण्याचा प्रयत्न असतो. आणि भाषेत वाक्प्रचार, अलंकार हे यथायोग्य पणे आपल्या भावना शब्दात मांडता याव्यात यासाठीच असतात.

कुणी तरी म्हटलं आहेच की जो कवी असं म्हणतो की मी फक्त स्वतःसाठी लिहितो तो कुठेतरी स्वतःशी प्रतारणा करत असतो. कारण तुम्ही एकदा तुमचं साहित्य जनतेसमोर किंवा मित्रांसमोर आणलं की चांगलं लिहीत राहण्याचं उत्तरदायित्व तुमच्यावर येतंच. उस्फूर्त साहित्याला थोडया वास्तवतेच्या भानाची जोड दिली की वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहणं शक्य होतं. तुमची कविता त्याला त्याचीच कहाणी वाटू लागते. तीच तुमची दाद असते आणि पोचपावतीही. सुजाण रसिकांच्या काळजाला हात घालणं कुणाला इतकं सोप्पं वाटत असेल तर ते चूक आहे. आणि त्याच वेळी आपलं लेखन सगळ्यांनाच आवडेल असं वाटणंही चूक आहे. कारण त्यात वाचकाच्या आवडीनिवडीचाही भाग असतोच की. तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला सुचेल तेच लिहून वाचकांच ॠण फेडणं यात लेखकाच्या लेखनाच सार्थक आहे. अपेक्षा वाढतात हे खरंच आहे पण अपेक्षा निर्माण केल्यावर त्या पूर्ण करायला नकोत का? अता तुम्ही म्हणाल की मग असं सारखं तोच दर्जा टिकवणं कसं जमेल? यावर थांबणे हा उपाय आहे. जोपर्यंत दमदार आणि कमीत कमी स्वतःला (मनापासून) आवडेल असं काही सुचत नाही तोपर्यंत थांबावं. सुरेश भट ज्याला थांबता येत नाही तो खरा कवी नव्हे म्हणतात ते यासाठीच. कारण नाहीतर तुम्ही अपेक्षांच्या पुरात वाहून जाल. तुम्हीही आणि तुमचे लेखनही.



अभिजित...

Labels: ,

3 Comments:

At 5:08 PM, May 04, 2007 , Blogger Yogesh said...

हे कवींसाठी सपशेल खरं आहे ;)

 
At 5:19 AM, May 05, 2007 , Blogger Ranjeet said...

100% correct! Ekdam "Dil ki baat" bolalaas!

 
At 11:29 AM, May 08, 2007 , Anonymous Anonymous said...

far chhaan lihilays! :-)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home