Monday, April 23, 2007

एका लग्नाची गोष्ट

किती लोकांना मोताळा कुठे आहे किंवा अगदी बुलढाणा कुठे आहे हे माहीत आहे. बुलढाणा नावाचा एक जिल्हा महाराष्ट्रात आहे या पलिकडे मलाही कालपरवापर्यंत जास्त माहीत नव्हते. माझ्या एका वर्गमैत्रिणीच्या लग्नाला मोताळ्याला जाण्याचा योग आला. विदर्भ-खानदेश यांच्या सीमेवर बुलढाणा जिल्हा आहे. कधीही कुठल्याही चांगल्या-वाईट बातम्यांमध्ये मी या जिल्ह्याचे नाव ऐकले नाही. त्यामुळे एका मित्राने बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण आहे असं सांगितलं तरी मी त्याला ठाम विरोध केला नाही. आता एका मित्राने आणि दुसर्‍या मित्राने असं सर्वनामात बोलून कोडी घालण्यापेक्षा सरळ मुद्द्याकडेच वळतो.


...१...

संदीप, मी आणि ओंकारने आमची वर्गमैत्रिण मनिषाच्या लग्नाला मु. खरबडी, ता. मोताळा, जि. बुलढाणा येथे जायचं ठरवलं. मी शिवाजीनगर बसस्थानकावर फोन करून पुणे मलकापूर गाडीची चौकशी केली. रात्री पावणे नऊ वाजता गाडी होती. पण सोबत मुली नसल्याने आम्ही वेळेवर म्हणजे अगदी आठ-साडेआठ वाजताच शिवाजीनगरला पोहोचलो. पावणेनऊची गाडी साडेनऊ वाजता आली. आत मुंगीला पाय ठेवायला जागा नव्हती. कंडक्टर केबिनमध्ये जाऊ देईना. ओंकार म्हणाला जा बिनधास्त. मी आणि संदीप मग केबिनमध्ये शिरून बसलो. तिथे आमच्या बरोबर अजून एक (माझ्यापेक्षा)जाडजूड इसम आत शिरला होता. मग ओंकारने बसच्या दारात पायरीवर बूड टेकले. एकंदर मुंगीपेक्षा लहान होऊन आम्ही जागेची साखर खाऊ लागलो. पहिला काही वेळ चांगला गेला पण झोपेचं काय? ड्रायवर तर आमच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. त्याने धमकीच देऊन ठेवली होती, झोपला तर गाडी थांबवून मागे पाठवीन म्हणून. मध्येच केबिनमधली लाईट लावून तो आमच्यावर नजर टाकायचा. डोळ्याला डोळा लागू दिला नाही ^%*नं. इकडे पायरीवर ओंकारला मागे टेकायला एक बॅग सापडली होती . औरंगाबाद येईपर्यंत त्याची बर्‍यापैकी झोप झाली होती. तेव्हा त्याने आम्हाला पायरीवर येण्याचा आणि स्वतः केबिनमध्ये जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पडत्या फळाची आज्ञा समजून संदीप आणि मी पायरीवर बसलो. तेव्हा कुठे जरा डुलकी लागली. पुढे रस्त्यात आलेला घाट, हादरे वगैरे काही आठवत नाही. मोताळा शहर मलकापूरच्या आधी येतं. सकाळी सात वाजता मोताळ्याला उतरलो. उतरल्या उतरल्या आम्ही परतीच्या गाडीचं रिझर्वेशन केलं. आणि चिंतामुक्त झालो.

...२...

सुदैवाने खरबडी आमच्या नवनीतचे(चौथा जोडीदार) आजोळ होते. त्यामुळे सकाळी त्यांच्या घरी उतरलो. खरबडी एक चिमुकले गाव होते. आणि अखिल महाराष्ट्रातली काही निर्मल ग्रामे सोडली तर ज्या पद्धतीने सकाळचे विधी उरकतात तसे बर्‍याच दिवसांनी मोकळ्या हवेत आम्हीही उरकून घेतले. मस्त थंड विहीरीच्या पाण्याने आंघोळ केली. तिथे कळले की गावात नळाचे पाणी दहा-पंधरा दिवसातून एकदा येते. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रात हे जरा खटकलेच. गाव अस्सल अहिराणी भाषा बोलत होते. मले, तुले, हाव ऐकायले मजा येत होती. मधातच नवनीतचा मामेभाऊ दिपक आणि बहीण मेघना लुडबूड करायचे. दिपक यत्ता दुसरीत होता पण आजकालच्या हुशार पिढीचं प्रतिनिधित्व करत होता. सराईतपणे मोबाईल, टी. व्ही हाताळत होता. ताईवर दादागिरी करत होता. मामींनी तोपर्यंत नाष्टा समोर आणला. ज्वारी आणि गव्हाचं बिबळं, नुसत्या ज्वारीची सावडं, करंज्या, लाडू भरभरून वाढले होते. ते पाहून गावाकडं काही हातचं राखून ठेवायची पद्धत नसते हे पुन्हा पटलं. हे कमी की काय म्हणून एक झकास गवती चहाचा कप पुढ्यात आला. आम्ही सर्वार्थानं एक वेगळी संस्कृती, एक वेगळा पाहुणचार अनुभवत होतो. लग्न अकरा वाजता होतं आणि आम्ही नऊ वाजताच आवरून बसलो होतो. गाव फिरून यायची हुक्की आली म्हणून आम्ही बाहेर पडलो. एक एक रस्ता पकडून बरंच अंतर चालून गेलो की परत यायचो. मग दुसरा रस्ता. तिकडची शेतं, विहीरी, झाडं, माणसं सगळं थोडसं वेगळं, नवीन वाटत होतं. गावातले काँक्रिटचे रस्ते, गावाला शहराशी जोडणारे डांबरी रस्ते पाहून अभिमान वाटला. नाहीतर यूपी-बिहारच्या वाड्या-वस्त्यांमध्ये कुठे आहेत वीज-पाणी-रस्ते. लग्नाची वेळ झाली तसे आम्ही मांडवाकडे (लग्नमंडपाकडे) सरकलो. तिकडे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम चालू होता. त्यात आपल्या समाजातल्या काही लोकांची लग्नाआधी आणि नंतर देव म्हणून पूजा करायची असते असं कळालं. मनिषाला आम्ही आल्याची वर्दी दिली आणि मांडवात नजर टाकायला मोकळे झालो.


...३...

लग्नाच्या पद्धती स्थळ, धर्म, जात यानुसार बदलतात. वर्गमित्र आणि मैत्रिणींच्या लग्नांत आम्हाला हेच प्रत्ययास येतंय. मागे दापोलीला मैत्रिणीच्या बहिणीचं कोकणी लग्न, नंदुरबारला अटेंड केलेलं गुजराथी(किंवा गुजर) लग्न, मुंबईत मैत्रिणीचं ब्राम्हणी पद्धतीचं लग्न, रूम पार्टनरचं नगरी ष्टाईल लग्न आणि पुढेही नागपूर, पुणे, कराड(?) अशी लग्ने अटेंड करण्याचा योग येणार आहेच. सर्व लग्न पद्धतीमधले गुणदोष यांची चर्चा होत असतेच. आणि हे वर्‍हाडी लग्न अपवाद नव्हतंच. अकराचं लग्न साडेअकराला लागलं हा एकच दोष. काही ठिकाणी ही रीतच असते. इकडे नवरा नवरी मंगलाष्टकापासून ते हार घालेपर्यंत राजा-राणी खुर्चीवर मस्तपैकी बसलेले होते. अक्षता पडल्या लगेच नवरानवरी भेटीगाठीसाठी मोकळे. मनिषा-योगेशचे(जोडपं) छानसे फोटो काढून आम्ही मागे बघतो तर पंगती बसल्या होत्या. आम्हीही बैठक मारली. पत्रावळीवर भात आला. मग चपातीही. लग्नात चपाती क्वचितच असते. आजूबाजूला बसलेल्यांनी चपाती मोडायला सुरुवात केली. पण आम्हाला कळेना काय चाललंय. समोरच्या पंगतीतल्या आजोबांनी विचारलं,"कोण्या गावचे तुम्ही?". समजलं की आपलं काहीतरी चुकतंय. नवनीतने सांगितलं की चपातीचा बारीक चुरा करून त्याचाच द्रोण करून वरण घ्यायला वापर करायचा. मी कसाबसा भात आणि चपाती एकत्र करून द्रोण(अहं खड्डा) तयार केला. बिचार्‍या संदीपला शेवटपर्यंत तो द्रोण जमला नाही आणि वरण-चपाती ऐवजी वांग्याची भाजी अन् चपाती खावी लागली. ओ़ंकारने मात्र सराईतपणे द्रोण करून वरण ओरपलं. भात आणि चपातीच्या द्रोणात वाढलेले तूप-वरण अप्रतिम लागत होते. अगदी बोटं चाटून खाल्ली आम्ही. वांग्याची भाजीसुद्धा झटकेबाज होती. पाहुण्याला आधी वाढायच्या सूचना वाढप्यांना सतत मिळत होत्या. सर्वांना वाढून झाल्याशिवाय जेवण सुरू झालं नाही तसंच उठतानाही सगळयांच झाल्यावरच आरोळी ठोकली गेली. साधं-सोप्पं पण रसदार जेवण आम्हा शहरी मुलांना तृप्त करून गेलं आणि लहानपणीच्या गावच्या आठवणी ताज्या करून गेलं. चार पंगती उठल्यावर नवरा-बायको जेवणार होते. आम्ही दोघांसोबत फोटो काढून घेतला. थोड्या गप्पा मारल्या. नाव घ्यायला लावलं. नंदुरबार आणि बुलढाण्याला हा अनुभव सारखाच आला. तिकडे नाव घ्यायला कोणी हट्ट करत नाही. मग आम्हीच दोन्ही वेळा हट्टीपणा केला . मनिषानं सुरेख नाव घेतलं. मला क्षूद्रबुद्धीला ते लक्षातही ठेवता नाही आलं. नवरोबांनी आढेवेढे घेतले मग त्यांना एका वाक्यात नाव घेण्याची सूट दिली, तेव्हा माझी जीवनसंगिनी मनिषा असं पण लगेच बोलले. नवर्‍यांना सूट दिली की लगेच फायदा घेतात. जेवणाचा अंमल जाणवू लागला होता. चार पंगती नंतर नवराबायकोच्या पाठीवर पापड फोडण्याचा कार्यक्रम होता. तोपर्यंत कुठेतरी विश्रांती घ्यावी म्हणून आम्ही तिथून सटकलो आणि नवनीतच्या घरी निघालो.


...४...

मध्येच वाटलं कशाला घरी जायचं? त्यापे़क्षा जवळ विठ्ठल-रुखमाईचं देऊळ होतं तिकडे जाऊ. नवनीतचा मामेभाऊ दिपक आणि आम्ही चौघे देवळात गेलो. देऊळ चांगलं मोठं होतं. आत एक सतरंजी ऐसपैस अंथरली होती. तेच आमंत्रण समजून आम्ही तिथे आडवे झालो. बोलता बोलता एक एक आवाज कमी होऊ लागला. आणि सगळे गाढ झोपून गेलो. दिपक इकडे तिकडे उड्या मारत होता तेवढाच आवाज. बाकी ऐन दुपारी देवळातल्या गारव्यात आम्ही मनसोक्त झोपलो. एकदोन तासांनी दिपकनं सगळ्यांना कानात वारं फुंकून, पायाला गुदगुल्या करून, केस ओढून उठवलं. तिथून पाय निघत नव्हता पण पापड फोडतात म्हणजे काय करतात हे बघायचं होतं. वाटेत सगळ्यांनी बर्फाचा गोळा खाल्ला. मजा आली. घरी येऊन हात-पाय धुऊन आम्ही लग्नाकडे गेलो. तिकडे गेल्यावर समजलं की पापड-बिपड फोडून-बिडून सगळं झालं होतं आणि मानपान, ओवाळणी असे एक दोन कार्यक्रम राहिले होते. उपस्थित लोकांना थंडगार पाणी दिलं जात होतं. परत परत आदरातिथ्याचे नमुने मिळत होते. शेवटी मुलीची पाठवणी करायचा क्षण आला. आईच्या डोळ्यांत पाणी तरारलं. मुलगीही भावनावश झाली होती. बहीण-भाऊ बरोबर होते. धीर देत होते. नवरा बिचारा कावराबावरा झाला होता. मनिषाचे बाबा-भाऊ जरा बाजूला उभे होते. पण पुरुषाचे अश्रू कुणाला दिसले? लग्न नवर्‍याच्या घरी असल्याने मुलगी तिथेच राहणार होती. मग दुसर्‍या दिवशी तिला परत माहेरी घेऊन जाणार होते. नवराबायको बसले आणि गाडी हलली. आम्हीही मनिषाच्या घरच्यांचा निरोप घेतला.

...५...

नवनीतच्या घरी येऊन परतीची तयारी सुरू केली. तोवर मामींनी पोहे बनवलेच होते. किती लाड झाले या दोन दिवसात आम्हालाच माहीत. घरातल्या सर्वांसोबत एक फोटो काढला. सर्वांना दाखवल्यावर उमटलेले कौतुकाचे उद्गार कॅमेरा घेतल्याचे सार्थक करून गेले. पुण्याला येणं केवळ अपरिहार्य होतं म्हणून निघालो. आपापल्या बॅगा पाठीवर टाकल्या. नवनीत आणि दिपक सोबत मोताळ्याला आले होते. आमची बस येईपर्यंत गप्पा मारल्या. उसाचा फक्कड रस पिला. दिपक तर आम्हाला सोडतंच नव्हता. शेवटी मलकापूर्-पुणे गाडी फलाटावर लागली. मूकनयनांनी आम्ही नवनीत-दिपकला निरोप दिला. सकाळीच रिझर्वेशन केल्याने जागेचा प्रश्न नव्हता. लग्न परफेक्ट झालं असं एकमेकाला सांगतच आम्ही झोपी गेलो. जातेवेळी झालेल्या झोपेच्या खोबर्‍याची बर्फीरुपात परतफेड झाली अन परत पुण्याला येईपर्यंत क्वचितच जाग आली.

***

अभिजित...

Labels:

Friday, April 13, 2007

लगीनगप्पा-२

कृपया अगोदर लगिनगप्पा १ ची प्रस्तावना वाचावी म्हणजे लगिनगप्पात कधीही सामील झालात तरी लिंक तुटणार नाही. :-)
.............................................................................
एकदा शेजारच्या गावचे काही पाहुणे आपल्या घरी आले. चार-पाच जण होते. आणि म्हणाले की तुमच्या अक्काला मागणी घालायला आलो आहोत. तसे ते आईच्या (माझ्या आज्जीच्या, तिला तिची मुलं प्रेमानं ’म्हातारे’ म्हणायचे) लांबच्या नात्यातले होते त्यामुळे मुलगी बघण्याचा वगैरे प्रोग्रॅम करायला काही हरकत नव्हती. गावातली अजून चार-पाच मानाची माणसं आली. मुलगी बघितली. आणि बोलणी सुरू केली. सगळं पसंत आहे असं म्हणून मुलाकडच्यांनी देण्याघेण्याचं बोलताना २५ तोळे सोनं आणि पन्नास हजार रोख रक्कम मागितली. आम्ही सगळे विचारात पडलो. एक तर आमची लेवल ५-१० तोळे सोनं अन १५ हजारभर रुपये अशी मनात ठरली होती. आणि त्यात ते आईच्या नात्यातले त्यामुळं डायरेक्ट नकार कसा सांगायचा अशा कोड्यात पडलो होतो. दोन तीन दिवसात कळवतो असं सांगून विषय लांबणीवर टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी आई म्हणाली, "मी आज जाऊन येते पावण्याच्या घरनं, मग सांगूया काय ते."
संध्याकाळी आई परत आली. आली ती हसतंच आली. मग लागली किस्सा सांगायला. "घरात गेले तवा मालकीण घरात हुती. पाणी घेउन येईस्तवर भाईरल्या खोलीत ठेवलेल्या ज्वारी आन भाताच्या कणग्यावर थाप मारून बघितली. निस्ता पोकळ आवाज. हौद बघितला. त्यो पन मोकळाच. घरात जरा मालकिणी बरोबर नदार टाकली. काय दम न्हाई. आन खायला आन न्हाई. असल्या घरात माझी पोरगी देऊ व्हंय? आन ती बी मी २५ तोळं सोनं , ५० हजार हुंडा देऊन?" आजीनं तिच्या डोळ्यानं बघून खात्री केली आणि आम्ही नि:श्वास सोडला. बोला तुमच्या लव मॅरेजमधी आसलं कसं बघणार?

Monday, April 09, 2007

लगीनगप्पा-१

आता घरी लग्नाचा विषय सतत चर्चेला असतो.(!!) तेव्हा साहजिकच जुने किस्से, घटना परत ओठांवर येतात. वडीलांकडे(नाना) तर याबाबतीत गोष्टींचा शक्यतो सत्यकथा किंवा स्वानुभवाचा खजिनाच आहे. त्यातले काही मी लिहायचा प्रयत्न करतोय. एकदा नाना इतर काही जाणत्या माणसांसोबत आमच्या नात्यातल्याच मुलीसाठी स्थळ बघायला गेले होते. इथून पुढे नानाच निवेदक आहेत.
..............................................................

आम्ही अक्काला स्थळ बघायला सातारला गेलो होतो. सकाळचे अकरा वाजले होते. चारपाच जुनीजाणती माणसंपण बरोबर होती. घर बरं दिसत होतं. शेतीभाती होती. भाऊबंद होते. पण पावणे कुठे दिसत नव्हते. पावणे म्हणजे मुलाचे वडील. त्यांच्या मंडळींना विचारलं तर म्हणल्या रानात गेलेत येतील तासाभरात. वाट बघितली. जरा बोलाचाली झाली तरी अजून पावण्याचा पत्ता नाही. जेवण झालं. आता येतील मग येतील. आमच्या मनात पाल चुकचुकायला लागली. तेवढ्यात पावण्याचा आवाज आला. आले पण ते काय आत येईनात. आमचे भाऊ बघतात सगळं असं म्हणून बाहेर सोप्यात बसले. बारीकसारीक इकडचीतिकडची चौकशी झाली आता निघायची वेळ झाली पण पावणा बाहेरच. चार एक वाजता निरोप घेऊन परत निघालो. गावातंच वाटंत एक मारुतीचं देऊळ होतं. म्हटलं जरा दर्शन घेऊ. दर्शन घेऊन बाहेर कट्ट्यावर जरा बसलो होतो. गुरामागनं रानात गेल्याला एक शेतकरी आमच्याजवळ आला. आम्ही गप्पा मारत होतो. चांगलं फक्कड स्थळ भेटलं वगैरे. म्हटलं जरा गावातल्या माणसाला विचारावं. "काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे या घराबद्दल", आम्ही विचारलं. शेतकरी अजून जरा जवळ आला आणि म्हणाला," अता मी काय कुणाचा वेल वाढत आसल तर खुडु इच्छित न्हाई. पण गावातच राहतूय आन खोटं बोलला म्हणाय नगो म्हणून सांगतो. तुम्ही तिथं गेलात तवा पावणे घरात हुते का?""नाही. रानात होते. निघताना आले.""परत आल्यावर ते घरात आले का?""नाही.""तुम्ही त्यांचे पाय बघितले का?""नाही." शेतकरी कुजबुजला "आहो, महारोग हाय त्या घरात. पावण्याच्या पायावर डाग दिसत्यात." मग जे आम्ही झपाझप स्टँड गाठलं. चिडीचूप. सरळ घरी. आम्हाला यंदा लगीनच करायचं नाही असा निरोप पाठवून दिला.

Labels: