Tuesday, August 28, 2007

पुरंदर

पुरंदर. पुरंदर म्हटलं की आठवतो मुरारबाजी, पुरंदरचा तह आणि संभाजीराजांचा जन्म. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या मुरारबाजीचा गड पुरंदर. वज्रगड पडल्यावर कशी आणि कुठे लढाई झाली असावी. "अरे तुझा कौल घेतो की काय?" असं म्हणत दिलेरखानावर चाल करून गेलेला मुरारबाजी कसा दिसतो हे बघायचं होतं. पुरंदरला जायचं म्हणून शनिवारी सकाळी पाच जणांनी स्वारगेटला भेटायचे ठरले. सकाळी फोनाफोनी करून सगळ्यांनी एकमेकांना उठवले. अमितचा निरोप आला की आम्ही १० मिनिटात येतोय. खरंतर अमित एकटाच येणार होता पण ऐनवेळी सलिलही पुरंदरला यायचं म्हणून उत्साहाने सकाळी उठून आला होता. अगदी शेवटच्या क्षणी एखादा सवंगडी गळाला तर जितकं दु:ख होतं त्याहीपेक्षा जास्त आनंद ऐनवेळी कोणी मिळाला तर होतो. असं क्वचित होतं पण ट्रेकला जायला हुरुप येतो. आम्ही सहाजण सात वाजता म्हणजे समिराज, ओंकार, अमित, सलिल आणि सुदर्शन (अर्रेच्या मी राहिलो की) सासवडला जाणार्‍या गाडीत बसलो. स्वारगेटहून पुरंदरला जायला कापूरहोळमार्गे पुणे-बेंगलोर महामार्गानेही जाता येतं. पुरंदर सासवड आणि कापूरहोळला जोडणार्‍या रस्त्यावर आहे.

सासवडला जाताना दिवे घाट लागतो. हा रस्ता म्हणजे माऊलींच्या पालखीची वाट. मध्येच एका वळणावर खाली मस्तानी तलाव दिसतो. पावसाच्या शिडकाव्याने हिरवेगार झालेले डोंगर, वळणावळणाचा प्रशस्त रस्ता, मस्तानी तलाव आणि बाजूच्या शेतात तरारून वर आलेली पिके यामुळे प्रवास रमणीय झाला. सासवडला उतरून भोर गाडी पकडली आणि नारायणपूरला उतरलो. नारायणपूरला दत्ताचं आणि नारायणेश्वराचं मंदीर आहे. नारायणेश्वराचं मंदीर सुमारे १०००-१२०० वर्षापूर्वीचं आहे. नारायणेश्वराचं दर्शन घेऊन बाजूलाच एका हॉटेलमध्ये दणकट नाष्टा केला. मिसळ झटकेबाज होती हे वेगळं सांगायला नकोच. नारायणेश्वर मंदीराच्या जवळून जाणारी वाट पुरंदर-वज्रगडकडे जाते. डांबरी रस्त्याने थोडं चाललं की आपण पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात येतो. इथून एक गाडीवाट तुम्हाला अनेक वळणे घेत थेट मुरारबाजींच्या पुतळ्याजवळ घेऊन जाते. पण ही आमची वाट नव्हती. सोप्या वाटेने जायचं नाही हा गुणधर्म प्रत्येकाच्या अंगी होता.

किल्ल्याची चढण बर्‍यापैकी दमछाक करणारी आहे. पण निसर्गराजाने साथ दिल्याने पूर्णवेळ आकाश अभ्राच्छादित राहिलं. नऊ वाजता सुरुवात करून मध्ये थोडी विश्रांती घेत, एकमेकांना चिडवत खिदळत ११-११.३० वाजता बिनी दरवाज्यात पोहोचलो. दरवाजावरून वळणे घेत येणारी गाडीवाट सुंदर दिसते. मागे एक जुना चर्चदेखिल आहे. बिनी दरवाजातून उजवीकडे आलं की रणझुंजार किल्लेदार मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा आहे. समोर आलेल्या गनीमाची पाचावर धारण बसली असणार हे नक्की. पुतळ्यासमोर उभं राहिलं तर उजवीकडची वाट वर बालेकिल्ल्याकडे जाते आणि दुसरी वज्रगडाकडे. खालून येणारी गाडीवाट पुतळ्याकडे येऊन वज्रगडाला जाणार्‍या वाटेला मिळते. पुतळ्याचे रौद्ररूप डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो.

आम्ही बालेकिल्ला आणि वज्रगडाकडे जाण्याऐवजी पुतळ्यासमोरच्या गाडीवाटेने पुरंदरमाचीकडे आलो. माची वरून बालेकिल्ल्यावर जायला दुसरी वाट शोधावी(मघाचाच गुणधर्म) म्हणून पद्मावती तळ्याच्या वरच्या दिशेने चढायला सुरुवात केली. पण काही वेळातच सरळ उभा कडा समोर आला. अपने बस की बात नही म्हणून परत मुरारबाजींच्या पुतळ्याकडे आलो. उजवीकडच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या दिशेने चढायला सुरुवात केली. अधूनमधून पावसाचा मारा होत होता पण शिणवटा पळून जात होता. पुरंदरचा बालेकिल्ला राजगडच्या बालेकिल्ल्यापेक्षा कमी उंचीवर आहे आणि चढणही सोपी आहे. चढण संपली की दिल्ली दरवाजा आहे. दिल्ली दरवाजातून वर आलं की अजून एक दरवाजा आहे. दरवाजाच्या भिंतीवर रंगाने कल्याण दरवाजा असं लिहीलं आहे पण पूर्वेकडे तोंड करून असल्याने थोडा अविश्वास नक्कीच वाटला आणि पोट्ट्यांनी वादही घातला.

कल्याण दरवाजासमोर खंदकडा आहे. खंदकड्याच्या अगदी टोकावरून वज्रगड, पुरंदर-वज्रगड मधली भैरवखिंड, काही बंगले, राजाळ तळे असे विहंगम दृष्य दिसते. खंदकड्यावर काही झाडीत झाकल्या गेलेल्या विहीरी आहेत. खंदकड्याच्या टोकावर बुरुज आहे. तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन पोटपूजा करून कल्याण दरवाजाकडे आलो. कल्याण दरवाजातून आत येऊन थोडं पुढं आलं की राजगादी टेकडी आहे. येथे संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. मोठ्या उत्साहाने टेकडी वर चढून गेलो पण वरती एका बाजूला भक्कम तटबंदीखेरीज काहीच बांधकाम शिल्लक नव्हतं. मराठा साम्राज्याच्या दुसर्‍या छत्रपतीच्या जन्मस्थान नैसर्गिकदृष्ट्या नष्ट झालं असलं तरी सरकार आणि पुरातत्त्वविभागाने तिथे एक पुतळा तरी स्थानापन्न करायला हवा. टेहाळणीसाठी तटबंदीत बनवलेली इंग्रजी झेड आकाराची खिडकी अप्रतिम होती.

राजगादीवरून खाली येऊन तसंच पुढं गेलं की केदार टेकडी आहे. त्यावर केदारेश्वराचं पुरातन मंदीर आहे. राजगादी टेकडीवरून केदारेश्वराचं दर्शन घेणारी शिवराय आणि शंभूची जोडी क्षणभर डोळ्यासमोर तरळून गेली. केदार टेकडीवर फक्त केदारेश्वर मंदीर आहे जणू त्या मंदीरासाठीच ती टेकडी तिथे आहे. मंदिर तसं लहान आहे पण रेखीव आहे. समोर नंदी आणि एक दीपमाळ आहे. महाशिवरात्रीला येथे भाविकांचा पूर येतो. मंदिरात दुसरे चार जण आधीच झोपले होते म्हणून आम्ही बाहेरच थांबलो. वरूणराजाने काही वेळासाठी आमची रजा घेतली. आणि मंदिराच्या दगडी व्हरांड्यात आम्ही पहुडलो. दोन वाजले होते. सर्वांनी मस्त तासभर डुलकी कसली झोपच काढली. जगात सर्वात सुंदर काय असेल तर निसर्ग. पाय निघत नव्हता पण परत तर जायचंच होतं जीवनाच्या रहाटगाडग्याला जुंपून घेण्यासाठी. केदारटेकडीच्या मागे कोकण्या बुरुज आहे आणि टेकडीच्या बाजूने गेलं की केदार दरवाजा आहे. पुढे प्रचंड मोठी सपाट माची आहे.

बालेकिल्ला उतरून आम्ही वज्रगड आणि पुरंदरच्या मध्ये असलेल्या भैरवखिंडीत आलो. येथे एन. सी. सी. चे काही बंगले आहेत. किल्ला पूर्वी मिलिटरीच्या अखत्यारीत असल्याने वर बरीच बांधकामे आहेत. पण बहुतेक रसिक माणसाने बांधली असल्याने किल्ल्याची शोभा घालवत नाहीत. येथे संभाजीराजांचा पुतळा आहे. धर्मवीराला वंदन करून राजाळ तळ्याकडून आम्ही पुरंदरेश्वर मंदीरात आलो. थोरल्या बाजीरावाने या मंदीराचा जीर्णोद्धार केला होता. मंदीरामागे पेशव्यांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. पुरंदरेश्वर मंदीरासमोर एक उपहारगृह आहे तिथे चहा-बिस्किटे खाऊन आम्ही तडक उतरणीला लागलो. किल्ल्यावरून खाली आलो आणि इतका वेळ गुडुप झालेला पाऊस तुफान कोसळला. सायंकाळी सहा वाजता परत नारायणेश्वर मंदिरात आलो.

किल्ल्यावर ऐसपैस माच्या आहेत. बालेकिल्लाही मोकळा आणि मोठा आहे. बचावासाठी भक्कम सरळसोट कडे आहेत. पुणे, भोर, सासवड पट्टयावर नजर ठेवता येईल अशी मोक्याची जागा त्यामुळेच हा किल्ला मराठी इतिहासात बर्‍याच महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार झाला आहे. किल्ल्याबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Labels: ,

Monday, August 20, 2007

राजगड

राजगड. राजांचा गड किंवा गडांचा राजा काहीही म्हणा पण मनाला भुरळ पाडणारा आहे खरा. मावळ खोर्‍यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड. राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

शनिवारीच राजगडावर जाण्याचा योग आला. एका व्यावसायिक ट्रेकर्स ग्रुप बरोबर आम्ही सहा मित्र राजगडावर गेलो. पुणे सातारा रस्त्यावर नसरापूर फाट्याला आत वळालो आणि गुंजवणे गावात आलो. तशा गडावर जाण्याच्या तीन वाटा आहेत. चोर दरवाजा, पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा. सध्या थोड्या पडझडीमुळे गुंजवणे दरवाजा वाट बंद आहे म्हणून आम्ही चोरवाटेने गडावर जायचं ठरवलं.

गुंजवणे गाव एकदम टुमदार म्हणतात तसं आहे. भाताची खाचरं, विहीर, त्यावर पाणी शेंदण्यासाठी रहाट, शेजारून खळखळत वाहणारा ओढा, पलीकडे भवानीआईचं मंदिर आणि घनदाट झाडी. बस थांबली तिथे पोटापाण्याची सोय झालीच आणि फक्कड चहा पिऊन राजगडाच्या वाटेला लागलो. मोठ्या आणि सर्व वयोगटातील माणसांचा समावेश असलेल्या ग्रुपबरोबर असल्याने चालण्याचा वेग तसा मंदच होता. पण त्यामुळे आम्हाला भरपूर विश्रांती मिळाली आणि दमणूक झाली नाही. एकामागून एक डोंगर पार करत पद्मावती माचीच्या पायथ्याला पोहोचलो. अचानक उभी चढण समोर लागली. तशा छोट्या छोट्या पायर्‍या आणि बाजूला लोखंडी कठडे आहेतच. पण तरीही सवय नसणार्‍यांनी जरा काळजी घेणे आणि डोंगराच्या बाजूने चढणे उतरणे, शरीराचा भार चढताना पुढे व उतरताना मागे/सरळ देणे अशी पथ्ये पाळणे आवश्यक आहे. हा चढणीचा टप्पा ओलांडला की चोरवाटेचा छोटा दरवाजा अचानक समोर येतो. आणि लगेच आपण पद्मावती तळ्यासमोरच निघतो. इतक्या उंच ठिकाणी एवढं भव्य तळं पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. पद्मावती मंदिरात ३० एक जण व्यवस्थित राहू शकतील. थोडा वे़ळ थांबून बॅगमधले खाण्याचे पदार्थ पोटात टाकून पुढे निघालो.

इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. संध्याकाळी परत पुणे गाठायचे असल्याने आम्ही फक्त बालेकिल्ला पाहायचा म्हणून सरळ गेलो. राजगडाचा बालेकिल्ला जणू किल्ल्यावर किल्ला असल्यासारखा आहे. माझा एक मित्र म्हणाला होता की राजगड जिथे संपला असे वाटते तिथून सुरु होतो. आता ते अक्षरशः पटते. रिमझिम पाऊस, बाजूचे घनदाट झाडी यामुळे ही वाट मला थोडी झपाटल्या वाटेसारखी(हाँटिंग) वाटली. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. इथेही थोडा शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. आमच्या सोबतच्या एक काकू तिथून परत जात होत्या. पण सोबतच्या काही जणांनी विश्वास दिल्यावर त्याही बालेकिल्ल्यावर आरामात आल्या.

बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे. आमच्या गाईडनुसार भारतातील ब्रम्हदेवाच्या मोजक्या मंदिरांपैकी हे एक. राजवाडा, सदर, दारूकोठाराचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची भव्यता, राजधानीच्या जागेची निवड पाहून छाती भरून येते. इंग्रजांनी तोफा लावून किल्ल्यांवरची बांधकामे आणि पायर्‍या उध्वस्त केल्या आहेत. बालेकिल्ल्यावर काही वेळ थांबून आम्ही परत फिरलो. चढणे सोपे उतरणे अवघड हे ऐकलेले वाक्य अनुभवायला मिळाले. तकलादू कठड्यांना धरत पायर्‍यात कोरलेल्या खोबणींचा आधार घेत आधीची उभी चढण उतरलो. बालेकिल्ला उतरून मघाच्या तिठ्यावर येऊन थांबलो. अजून बाकीचे उतरायला आणि एकंदरीत बराच वेळ हाताशी होता. तेव्हा संजीवनी माचीवर जाऊन येण्यासाठी मुख्य व्यवस्थापकाला गळ घातली. मग बालेकिल्ल्याला उजव्या बाजूने वळसा घालून संजीवनी माचीच्या सुरुवातीला पोहोचलो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. चिलखती म्हणजे दुहेरी तटबंदी. शत्रूसैन्याने जीवाचं रान करून बाहेरील तटबंदी पाडली की त्याला आतली तितकीच भक्कम दुसरी तटबंदी दिसते. अवसान गळाल्यासारखी अवस्था होते त्याची. शत्रू पुन्हा तयारी करेपर्यंत मावळे बाहेरील तटबंदी पुन्हा बांधून घ्यायचे. सोबतच्या लहान मुलांचे पाय आता पुरे म्हणू लागल्याने संजीवनी माची अर्धी पाहीली आणि मागे वळालो.

पद्मावती माची शेजारी एक पुरातत्व खात्याची कचेरी आहे. तिथे गरमागरम चहा पिलो. खरोखर अमृततुल्य वाटला. जान मे जान आ गई. मग किल्ला उतरायला सुरुवात झाली आणि पावसालाही. कधी रपरप तर कधी भुरभुर पाऊस पडत होता. मजा येत होती. पण आधी जी सोपी वाट होती तीच पावसाने भयंकर निसरडी झाली होती. आणि आम्हा सहा जणांपैकी सर्व सहाजण एकेकदा तरी सपशेल धरणीप्रिय झाले. एकेक पाऊल टाकत कधी हातही बाजूला टेकवत एकदाचे मैदानात आलो. सर्वांचे कपडे लाल रंगात रंगले होते. तसेच गेलो आणि गावातल्या ओढ्यात बसलो. हातपाय धुऊन कपडे बदलून पुन्हा एकदा अमृततुल्य चहा घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सकाळी ६.३० ला निघून रात्री ८.३० ला परत पुण्यात आलो.

किल्ल्यावर पहायची राहिलेली ठिकाणे बरीच आहेत. तेव्हा पुन्हा एकदा राजगडाला मुक्कामी जाणे क्रमप्राप्त आहे.

Labels: ,