Monday, July 02, 2007

||शिवदुर्गदर्शन||

राजाशिवाजी.कॉम तर्फे आयोजित केलेले 'शिवदुर्गदर्शन' हे शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन नुकतेच पुण्याला गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाले. प्रदर्शनात जवळजवळ ४०,००० प्रकाशचित्रे(फोटोसाठी मला आवडणारा प्रतिशब्द) मांडण्यात आली होती. अवाढव्य पण तितकेच कलात्मक असे हे प्रदर्शन होते. शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणीच होती. विश्वविक्रम होतो की नाही यात मला स्वारस्य नव्हते. त्यापेक्षा शिवाजीराजांचे कार्य जनतेसमोर जगासमोर आणण्यासाठी काही लोक तन-मन-धन लावून झपाटून प्रयत्न करत आहेत हे तरी जनतेला कळाले. हे प्रदर्शन केवळ किल्याच्या चित्रांचे नव्हते ते होते राजांच्या कर्तृत्वाचे. त्यांनी कोणत्या परिस्थितीतून हे राज्य उभे केले याचे. प्रदर्शन पाहताना अशा ओळी नक्कीच सर्वांना सुचल्या असतील.

'ते लढले तेव्हा म्हणूनी हे महाराष्ट्र राज्य झाले
प्राणांची दिली आहुती अन् आमची अस्मिता झाले '

छाती दडपून टाकणारे कडे, डोंगरकपार्‍या अन त्यावर दिसणारे बेलाग बुरुज आजही राजांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात. शिवाजीराजे आणि त्यानी घडवलेल्या नररत्नांनी महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल केला आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे. नाहीतर आजकालच्या आदिलशहा-औरंगजेबांनी महाराष्ट्र राज्य होऊ न देण्याचा घाटच घातला होता.

आपल्याकडून आता काय अपेक्षित आहे? आपला इतिहास नीट वाचणे. जेणेकरून लहानमुलांना पावनखिंडीत तानाजी मालुसरेने पराक्रम गाजवला असे धडे आई-वडीलांकडून दिले जाणार नाहीत. (हे प्रदर्शनातच एक आई मुलाला सांगताना ऐकले). इतिहास वाचला तसेच गडकिल्ल्यांवर जाऊन आले की आपोआपच उर अभिमानाने भरून येतो. तोच अभिमान, आदर आपल्या कृतीत परावर्तित होईल याची दक्षता घेणे. म्हणजे राजांच्या किल्ल्यांवर आपले व आपल्या मुमताजचे नाव चुन्याने खरडणे, इकडे तिकडे कचरा टाकणे, किल्ल्यांना पिकनिक स्पॉट समजून दारुपार्ट्या आणि हुल्लडबाजी करणे अशा गोष्टी टाळाव्यात आणि दुसरा कोणी करत असेल तर त्यास परावृत्त करावे. किल्ला मंदिराइतकाच पवित्र आहे याचे भान ठेवावे. याबरोबरच राजे किंवा मराठे याबद्दल काही चुकीची माहिती कोणी प्रसारित करत असेल किंवा आपल्याच मित्रांना चुकीची माहिती असेल तर ती दुरुस्त करावी वगैरे.

राजाशिवाजी.कॉमच्या सर्व चमूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!


श्री सेवेसी तत्पर

अभिजित यादव

Labels: ,