Monday, December 14, 2015

एक वेगळा सोहळा

एक वेगळा सोहळा …

हल्लीच पुण्यात एका लग्नाला जायचा योग आला. माझी एक विप्रो कंपनीमधली सहकारी पुन्हा लग्नबद्ध झाली. ती  गेली ५-६ वर्ष पुण्यात राहिलेली होती. गेल्या वर्षी ती  तिच्या अमराठी अतामीळ नवऱ्यासोबत लग्न करून चेन्नईला गेली होती . तिच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाले आणि तिला त्याच्यासोबत पुन्हा पुण्यात महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचे होते. आता तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे. आधीच चेन्नई पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात असताना एवढे उपद्व्याप करण्याचे कारण काय. पण त्यांनी ते केलं. त्यांच्या मनाला जे पटलं, जे योग्य वाटलं ते केलं. माझ्यासाठी तर हा निव्वळ सुखद अनुभव होता. वेळात वेळ काढून ऑफिसला जायची वाट  वाकडी करून त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो आणि बरंच  काही घेऊन आलो. कौतुक करावसं वाटतं या दोन कुटुंबांचं जे मुळात प्रेमविवाहालाही  तयार झाले आणि या पुनर्विवाहाच्या हट्टाला ही आनंदाने तयार झाले. सर्वांचे पुण्याविषयीचे प्रेम, मराठी पद्धतीने लग्न करायची इच्छा, पुरासारख्या आपत्तीतूनही निराश न होता सोहळा साजरा करण्याची जिद्द  यामुळे विवाहबंधनाचा स्मरणीय झालेला तो दिवस सर्वांच्या एकमेकासबंधी असलेल्या निष्ठेची, प्रेमाची आणि आदराची ग्वाही देतो. या कामी वर-वधूला सहकार्य केलेले त्यांचे सर्व परममित्र-मैत्रिणी आणि विवाहविधी संपूर्ण सुलभ हिंदी भाषांतरासहीत संपन्न केल्याबद्दल ज्ञानप्रबोधिनी पुणे येथील स्त्री-पुरोहितांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करावेसे वाटतात.

लग्नविधीचा एकेक श्लोक अर्थासहित ऐकण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात एकमेकांविषयी काय अपेक्षा असाव्यात, आचरण कसे असावे, तसेच आर्थिक बाबतीत पारदर्शकता असावी वगैरे अनेक गोष्टीची हमी श्लोकांतून लग्नावेळी एकमेकाना दिलेली असते याकडे माझे लक्ष वेधले गेले. अन्यथा वर-वधूसह किती जणांच लग्नात  "शुभमंगल सावधान" म्हटलं की अक्षता टाकायच्या आणि "मम" म्हणा म्हटलं की "मम" म्हणायचं यापलीकडे लक्ष असतं. त्यादिवशी मला आपलं काही चुकत असल्यास त्याची जाणीव झाली आणि काही बरोबर असल्यास हे अपेक्षित आहे म्हणून विनम्रता आली. पाश्चिमात्य देशात "ओथ  रिन्युवल" नावाचा एक विधी असतो. कदाचित या दोघांसाठी एक वर्षानंतर आणि माझ्यासाठी सात वर्षानी असंच काहीसं झालं असं म्हणायला हरकत नाही. जबाबदारी, प्रेम, विश्वास आणि सामंजस्यानं केलेली वाटचाल नक्कीच या दोन जीवांच्या आयुष्यात  परमोच्च समाधानाचे क्षण वारंवार आणेल. आणि तसे ते येवोत हीच शुभेच्छा.

--अभिजित यादव 

Friday, November 27, 2015

कट्यार काळजात घुसली

आज मी कट्यार काळजात घुसली पुन्हा पाहिला. पहिल्या वेळी पाहिला तेव्हा एक अद्भुत कलाकृती अनुभवल्याचा आनंद झाला होता. मन प्रसन्न झालं झालेलं होतं.  पण खासाहेबांसारखी एक प्यास मनात जागली आणि तेव्हाच ठरवलं अजून एकदा नक्की पाहायचा. पहिल्या वेळेचा रोमांच ओसरल्यानंतरसुद्धा हा चित्रपट तेवढाच अतुलनीय वाटतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न आधी झाले नाहीत असे नाही परंतु 'या सम हाच'.

जसे संगीत तसेच चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक या चित्रपटाचा आत्मा आहेत. या सर्वांचे स्वत:चे असे खास व्यक्तित्व आहे. बरीच वर्षे या क्षेत्रात असल्यामुळे आपली शैली आहे. परंतु त्या शैलीच्या चौकटीबाहेर पडून एक अप्रतिम नजराणा त्यांनी आपल्यासमोर पेश केला आहे. दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेचा हा पहिलाच चित्रपट. अभिनेता म्हणून शंकर महादेवनचा हा पहिलाच चित्रपट. अमृता खानविलकर आणि मृण्मयीला अभिनेत्री म्हणून प्रामाणिक संधी देणारा हा पहिलाच चित्रपट. सचिन म्हणून सचिन बद्दल असलेल्या पूर्वग्रहांना छेद देणारा हा पहिलाच चित्रपट. या सर्वानी जीवाचं रान केलं आहे आणि संधीचं सोनं केलं आहे. चित्रपटाशी संबंधीत असलेल्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण क्षमतेनं आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. सर्वोत्तम कलाकृती घडवायची हा निर्धार सुरुवातीपासून असल्याशिवाय हे शक्य नाही.

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली तीन पात्रे सतत अधिकाधिक सशक्तपणे आपल्यासमोर येत राहतात. खासाहेबांच्या दाहक गायकी बरोबरच पंडितजींची सुमधुर तान मनाचा ठाव घेते. आणि या दोहोंचा मिलाफ असलेली  सदाशिवची स्वत:चा ठसा असलेली गायकी.  शास्त्रीय संगीतातलं ओ  की ठो कळत नसलेल्या माझ्या सारख्या अजाण रसिकालासुद्धा तीन प्रकारच्या गानकलेचा पूर्ण आस्वाद घेता येतो ही दिग्दर्शकाची किमया. हेच नाटक २०१० साली जेव्हा आलं होतं तेव्हा आपल्याला काही कळत नाही म्हणून पाहिलं नव्हतं. एकाच  वेळी  सर्व गायक उच्च दर्जाचे असतानाही  कोण जिंकतंय कोण  हरतय हे सर्वसामान्य रसिकालाही मूर्ख न बनवता समजावून दाखवताना सुबोधला आलेले यश निर्विवाद आहे. भले आम्हाला हरकती वगैरे नेमक्या समजल्या नसतील पण चित्रपट दुर्बोध नक्कीच नाही. उलट मधुसेवनात दंग झालेल्या भ्रमराप्रमाणे प्रेक्षक तल्लीन होतात. संगीत जगणं म्हणजे काय हे या चित्रपटातून समजतं.

मला हा चित्रपट आवडण्याची अनेक कारणे आहेत. एक ध्येय्य लक्षात ठेवून त्यासाठी अशक्य ते शक्य  करून दाखवले आहे.  ते करताना चित्रपटाचा आत्मा असलेल्या कलेच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. सचिनसारख्या बहुगुणी कलाकाराकडून कोणताही अतिरेक होऊ न देता आपल्याला हवे तसे काम करून घेतले आहे. कलाकारांनी व्यावसायिक दृष्टिकोन  ठेवतानाच जीव ओतून काम केले आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू  (जसे रंगभूषा, वेशभूषा ) यामध्ये  कुठल्याही प्रकारची हेळसांड नाही. चित्रपटाचा एकंदर अनुभव समृद्ध करणारे छायाचित्रण, नृत्य, पार्श्वसंगीत, संवाद लेखन, गीतलेखन यात वाखाणण्यासारखी गुणवत्ता आहे.

हा चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे पण प्राचीन भारतात कला क्षेत्रात असलेले वैविद्ध्य आणि वैश्विक परिमाण लक्षात येण्यासाठी हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरतो. कलाकारापेक्षा कला श्रेष्ठ आहे आणि  ही कला संस्कृती कोणत्याही घराण्याची मालमत्ता नाही. उलट संगीत वेगवेगळ्या घराण्यांचे संस्कार होऊन अधिक प्रभावी आणि श्रवणीय बनते. भारतीय शास्त्रीय  संगीत परंपरेचा सार्थ अभिमान वाटावा हा उद्देश मनात ठेवून निर्मिलेला हा चित्रपट नक्कीच ठेवा म्हणून जतन करावा असा आहे . सुबोध भावे आणि या चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. अजूनही तुम्ही पहिला नसाल तर नक्की  पहा. ही कट्यार काळजात घुसल्याशिवाय राहत नाही.

--अभिजित यादव

PS: https://en.wikipedia.org/wiki/Katyar_Kaljat_Ghusali_(film)

Labels:

Thursday, September 25, 2008

३६ तासात आठ किल्ले

मागच्या महिन्यात आम्ही ३६ तासात आठ किल्ले केले. त्याचा वृत्तांत आमच्या पैकी शेखर धुपकरने लिहिला होता. तो ई-सकाळमध्ये छापून आलाय.

त्याची ही लिंक.

अभिजित

Labels:

Monday, August 04, 2008

भीमाशंकर: शिडी घाटातून

२६-२७ ला भीमाशंकरचा ट्रेक आहे. आण्णा म्हणाला. शिडी घाटातून आहे म्हटल्यावर मी जरा टरकलोच. ऑफिसचा ट्रेक काढायचा आहे असं थातूरमातूर कारण द्यायचा प्रयत्न केला. काही मित्रांना सांगितल्यावर क्षणार्धात 'लाइफटाईम ट्रेक आहे ऑफिसचा ट्रेक पुढे कधीतरी काढ' असं मत मिळालं. शेखर म्हणजेच आण्णाचा पटनी ट्रेक क्लब आणि धूमकेतू ट्रेकर्स मुंबई यांनी २६-२७ तारखेला भीमाशंकर ट्रेक आयोजित केला होता. पैसे वगैरे भरल्यावर ट्रेकला जाईपर्यंत एकच विचार सारखा सारखा डोक्यात होता. आपण एका खणखणीत ट्रेकला चाललो आहोत. मजा येणार आहे. उत्साह आणि हुरहूर यांचं अजब मिश्रण शरीरातून दौडत होतं.

शुक्रवारी रात्री पुण्याहून ५० जण कर्जतसाठी निघालो. मोठी बस होती त्यामुळे प्रवासात काही चिंता नव्हती. बसमध्ये एकमेकांच्या ओळखीने आलेले, कुणाचे नातेवाईक किंवा कोणी एकटे आलेले वगैरे सर्व प्रकारचे ट्रेकर्स एकत्र आले होते. साधारण दहा वाजता बस पिंपरीतून बाहेर पडली आणि अंताक्षरीची धमाल सुरु झाली. लोणावळ्याच्या घाटात धुक्याच्या दुलईतून बस हळूहळू पुढे सरकत होती. ड्रायव्हरला १० फुटासमोरचे काही दिसत नव्हते. कर्जतला धूमकेतू ट्रेकर्सची एक कार आम्ही खांडसचा रस्ता चुकू नये म्हणून सोबतीसाठी आली होती. त्यामुळे आम्ही वेळेवर पोहोचलो आणि पुरेशी झोपही मिळाली. मुंबईहून धूमकेतू सदस्य आणि ३० एक ट्रेकर्स अगोदरच आले होते. खांडसच्या प्राथमि़क शाळेत मुलांची आणि धूमकेतूचे एक सदस्य संतोष म्हसकर यांच्या घरात मुलींची राहण्याची सोय करण्यात आली होती. आता मस्त झोपू म्हणेपर्यंत मुलांच्या टवाळक्या सुरु झाल्या. कसेबसे हसे आवरत शाळेच्या पत्रावरचा पावसाचा आवाज ऐकत झोप कधी लागली समजलंच नाही.

सकाळी ६ वाजता उठून निसर्गाच्या सानिध्यात प्रातर्विधी आवरले. गाव तर आमच्या आधीच उठलेले होते. त्यामुळे गाईगुरांचा गजबजाट सुरु झालेला होता. तेवढ्यात पावसालाही सुरुवात झाली. गरमागरम पोहे आणि चहाचा नाष्टा करून खांडस गावातून शिडीघाटाकडे जाणार्‍या रस्त्याला लागलो. डांबरी रस्त्याने २-३ किलोमीटर चालत गेलं की एक आडवा रस्ता मिळतो. तिथून एक रस्ता गणेश घाटाकडे जातो. आडव्या रस्त्याच्या शेजारून वाहणार्‍या ओढ्याजवळून जाणारी पायवाट शिडीघाटाकडे जाते. येथून आपला ट्रेक चालू होतो.

सुरूवातीला धूमकेतूच्या सदस्यांनी सर्वांना एकत्र करून ट्रेक दरम्यान घ्यावयाची काळजी तसेच पर्यावरण रक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. पुण्यातला कचरा पुण्यात आणि मुंबईचा मुंबईला परत गेला पाहीजे हे कटाक्षाने पाळायला सांगीतले. एकूण ट्रेकर्स किती आहेत त्याचा काउंट घेऊन आम्ही श्रीगणेशा केला. दर दहा ट्रेकर्समागे एक धूमकेतू सदस्य होता त्यामुळे वाट चुकण्याचा काही धोका नव्हता.

पाऊस सतत पडतच होता आणि आजूबाजूला हिरवेगार डोंगर डोळ्यांना सुखद वाटत होते. तरीपण भीमाशंकरला जाण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे शिड्या नेमक्या किती अवघड आहेत याकडेच सगळे लक्ष होते. त्यातच आण्णाने ईमेलमध्ये काठिण्यपातळी ४/५ लिहिल्याने नाही म्हटली तरी हळूहळू का होईना छाती धडधडत होती. साधारण तासादीडतासात पहिली शिडी दृष्टीपथात आली. शिडीवरून साहजिकच एका वेळी एक जण जाऊ शकत होता. ९० जण सोबत असल्याने शिडी पार करायला बराच वेळ लागत होता.

पहिल्या दोन शिड्या एका शेजारी एक आहेत. पण शिड्यांपेक्षाही शिडी संपल्या संपल्या जे १०-१५ फुटाचे अंतर आहे ते जास्त अवघड वाटले. पहिली शिडी पार केल्या केल्या कड्याला लटकून यावे लागत होते. धूमकेतूचे सदस्य अशा सर्व अवघड ठिकाणी मार्गदर्शनाला होतेच. कड्याला लटकायचे होते त्या ठिकाणी तर पाय ठेवायला जागा नव्हती तेव्हा पाय ठेवण्यासाठी धूमकेतूच्या संजयसरांच्या आणि राणेसरांच्या पायाचा आधार घेऊन सर्व ट्रेकर्सनी तो पॅच पार केला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या शिडीनंतरही असेच अवघड पॅचेस होते. एके ठिकाणी आपल्याला शक्यच नाही असे पॅचेससुद्धा धूमकेतूच्या मार्गदर्शनाखाली सहज पूर्ण झाले. तीनही शिड्या चढल्यावर आपण एका सपाट जागी येतो. इथे ट्रेक संपत नाही उलट इथे एकूण ट्रेकपैकी फक्त ४० टक्केच अंतर पूर्ण होते. इथे उजवीकडून गणेशघाटाची वाट येऊन मिळते. थोडी विश्रांती आणि चहावगैरे झाल्यावर पुढची वाट चालू लागलो. पुढे बर्‍यापैकी उभी चढण आहे. एका वेळी एकच जण जाऊ शकेल अशी वाट आहे त्यामुळे मुंग्यांची रांग चालली असल्याप्रमाणे चित्र दिसत होते. कदाचित यामुळेच याला मुंगी घाट म्हणत असतील. मुंगी घाटात फार अवघड असे पॅचेस नाहीत पण बराच वेळ वर वर चढत रहावे लागते. घाट संपता संपता आपण कार्वीच्या घनदाट जंगलात पोहोचतो. सर्वत्र दाट धुक्याचा थर पसरला होता. इथे महाराष्ट्राचा राजप्राणी शेकरू खार दिसते. उंच उंच झाडांच्या शेंड्यात शेकरूचे घरटे दिसत होते. शेकरू ही खार असली तरी खारुताई म्हणता येईल इतकी छोटी नक्कीच नाही.

मुंगी घाटातून वर आल्यावर पाठीवरचे सामान टाकून दिले आणि हिरवाईवर स्वतःला झोकून दिले. सर्व जण पूर्ण चढून वर येईपर्यंत तिथेच बसून राहिलो. हळूहळू सगळे एकत्र आले. तिथून डावीकडच्या पायवाटेने साधारण १ वाजता भीमाशंकर देवस्थानात पोहोचलो. राहण्याची सोय मंदीरासमोर एक हॉटेल आले त्याला लागून असलेल्या हॉलमध्ये केलेली होती. प्रकाशसरांनी सर्वांना तिथे राहताना घ्यावयाची खबरदारी वगैरे बद्दल लेक्चर दिले. (:-) रविवारी सकाळी निघणार असल्यामुळे शनिवारचा उरलेला सर्व वेळ आमच्या हातात होता. सरांनी गुप्त भीमाशंकर वगैरे बघून आला तरी चालेल असे सांगीतले होते. पण मी आणि माझ्या काही मित्रांनी मस्त ताणून देणे पसंत केले. साधारण अडीच वाजता जेवण झाले. आणि आम्ही आधी केलं तेच परत म्हणजे मस्त झोप काढली.
संध्याकाळी बाहेर पडून मंदिरातल्या गर्दीचा अंदाज घेतला. कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो त्यामुळे मंदिराचे धुक्यातले फोटो काढता आले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे मंदीर साधारण १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे आहे. भक्कम दगडी बांधकाम आणि तितकीच बारकाईने केलेली कला कुसर एक वेगळाच आदर निर्माण करते. एखाद्या वजनदार व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव चहूबाजूला पडावा तसा या दगडी मंदिराचा प्रभाव सभोवारच्या वातावरणावर पडलेला होता. मंदिरासमोरच चिमाजीअप्पांनी वसईहून आणलेली घंटा आहे. बाजूलाच दीपमाळ आहे. श्रावणाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदीराचा जीर्णोद्धार वगैरे चालू होता. थोडा वेळ मंदिरातल्या पवित्र वातावरणात प्रसन्न होऊन पुन्हा हॉलमध्ये आलो.

आमचे मित्रवर्य सरकार उर्फ मंदार साठेने तेवढ्यात बाहेर जाऊन पत्ते विकत आणले होते. त्यामुळे संध्याकाळी मेंढीकोट, जजमेंटचे डाव रंगले. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये रिंगण करून बसले आणि गाण्यांचा पाऊस सुरु झाला. धूमकेतूचे योगेशसर, दीपक, म्हात्रेसर रंगात आले होते. एकामागून एक एक से एक गाणी सादर केली जात होती. गझल म्हणा, चित्रपटगीते म्हणा, मराठी कोळीगीते, हिंदी गाणी आणि त्यात 'आयचा घो', "रेलगाडी", "ओ बेवफा तू क्या जाने"वगैरेंची फोडणी. अशी बहारदार मैफल रंगली होती. फोटोग्राफर कंपनी फोटो काढण्याची एकही संधी सोडत नव्हती. जेवण झाल्यानंतर हळू हळू झोपेचा अंमल दिसू लागला आणि आम्ही पथार्‍या पसरल्या.

सकाळी ४ वाजताच जाग आली. बराच वेळ बाहेर भटकून पांघरूणात परत येऊन झोपलो. मग एकएकेक जण उठू लागले. सगळ्यांच आवरून होईपर्यंत पोहे चहा तयार होता. आण्णाने अपने हात से पेले भरे और मैने सबको वाटे. इसकी वजहसे चाय की चव बहुत अप्रतिम लगी. पोटोबा शांत झाल्यावर मार्चिंग ऑर्डर्स आल्या. काही जण सकाळी देवदर्शन करून आले. निघण्यापूर्वी ग्रुप फोटो झाले. ८०-९० लोक कसे फोटोत मावले देवास आणि माझ्या कॅमेर्‍यास ठाऊक.

परतीच्या वाटचाली आधी सर्व धूमकेतू मंडळींच्या पराक्रमाची ओळख करून देण्यात आली. बरेच लोक एनआयएम मधून मौंटेनिअरींग अ वर्गात पास झाले होते. कुणी ९० पिनाकल मारली होती तर कुणी काय तर कुणी काय. आपण तर ऐकूनच सपाट झालो होतो.

येताना मुंगी घाट उतरायला फार वेळ लागला नाही. टुणुक टुणुक उड्या मारतच उतरलो. फक्त दोन ग्रुपमध्ये खुप गॅप पडला की धुमकेतूच्या सरांचा ओरडा खावा लागायचा. सगळे एका टीमचा भाग आहोत हे वारंवार आमच्या मनावर बिंबवलं गेलं. मुंगी घाट संपल्यावर पुन्हा आपण गणेश घाट आणि शिडी घाटातून येणारे(म्हणजेच जाणारेही) रस्ते जिथे मिळतात तिथे पोहोचतो. सर्व जण मुंगी घाट उतरून येईपर्यंत तिथेच थांबून आम्ही गणेश घाटाच्या रस्त्याला लागलो. सुरुवातीला कमी असणारा उतार नंतर जाणवण्याइतका तीव्र होत गेला. थोड्या वेळाने आम्ही वळून अशा ठिकाणी पोहोचलो जिथून शिडी घाट दिसत होता. बर्‍याच ट्रेकर्सनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. 'हे आपण चढून गेलो होतो' यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. शिडीघाटाच्या कड्यावर धबधब्यांची रांग दिसत होती. त्यात दोन धबधब्यांच्या मधून ९० अंशात वर जाणारी चिंचोळी वाट होती. तिथे आमच्या सारखेच अजून काही बहाद्दर आपली क्षमता आजमावत होते.

गणेश घाटात गणेशाचे मंदीर आहे. तिथून रस्ता एक वळण घेतो आणि आत्तापर्यंत डोंगर डावीकडे ठेवून उतरणारे आपण डोंगर उजवीकडे ठेवून उतरतो. भोलेबाबाचा गजर करणारे काही भाविक वर येताना भेटत होते. तसा पावसाळ्यात हा रस्ता माणसांनी गजबजलेला असतो. पण रात्री किंवा इतर सुनसान वेळी या घाटात लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा ह्या घाटात एकटे दुकटे राहण्याऐवजी ग्रुपने मार्गक्रमण करावे. अखंड पाऊस अंगावर घेत गणेश घाट पूर्ण केला. घाट संपता संपता डांबरी रस्ता सुरु झाला. म्हणे वन विभागाच्या परवानगीसाठी डांबरी रस्त्याचे काम थांबले आहे. अन्यथा बहुतेक मुंगी घाटापर्यंत की गणेश मंदिरापर्यंत डांबरी रस्ता होणार आहे. (म्हणजे वाटच लागणार असं दिसतंय)

ज्या ठिकाणी खांडस गावातील रस्ता गणेश आणि शिडीघाटाला जाणार्‍या रस्त्याला येऊन मिळतो तिथे आमची बस उभी होती. चालून चालून मोडकळीस आलेल्या पायांनी निश्वास टाकला. श्री. म्हसकर यांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. व्यवस्था कसली राजेशाही थाट होता. झणझणीत तर्री असलेलं बटाट्या-वाटाण्याचं कालवण आणि कोकणी जाडा भात. वरणही स्पर्धेत होतं पण गुलाबजाम एकदम फक्कड होते. झटपट चालत (आणि बसने) सगळ्यांच्या पुढे आल्याने पहिल्या पंगतीचा मान मिळाला. पोटाला तडस लागेपर्यंत खाऊन बसमध्ये मागच्या सीटवर जाऊन आडवा झालो. सगळ्यांच जेवण वगैरे आटपेपर्यंत एक तासभर झोप झाली. साधारण तीन वाजता परतीचा प्रवास सुरु झाला. गाडीत दमचराड, दमशरारत की काय ते वगैरे खेळता खेळता गाडी पिंपरीत कधी घुसली कळालंच नाही. पुणेकर मंडळींचा संपर्कप्रमुख आण्णा उर्फ शेखर धुपकर यांना भावपूर्ण निरोप देऊन गाडी पुण्यात आली. एकेक जण टाटा-बायबाय करून उतरून गेला. अपना मकाम आ गया तो हम भी उतर गये. सोच रहे थे की मंजील ज्यादा खुबसुरत थी या रास्ते..अभिजित

ट्रेकच्या फोटोंसाठी इथे भेट द्या


माझी चित्रशाळा: http://picasaweb.google.co.in/abhijit.yadav

Labels:

Tuesday, July 15, 2008

कोथळीगड

आदल्या दिवशीपर्यंत नक्की माहीत नव्हतं की ट्रेकला कोणकोण येणार आहे. विशाल, शंकर, मानसी, रोहीत, मी आणि समिराज नक्की येणार होतो. माझे आणि रोहितचे काही मित्र आणि मैत्रिणीपण येणार होत्या. त्यामुळे जरा खुशीत होतो. पण हळू हळू एक एक पत्ता गळत गेला आणि शेवटी आम्हीच सहाजण उरलो. नेहमीप्रमाणे आले ते मावळे आणि उडाले ते कावळे अशी घोषणा मनातल्या मनात करून वाटेला लागलो. सकाळी ६.१० ची सिंहगड यक्स्प्रेस पकडली आणि कर्जतला ८ वाजता उतरलो. हा लेख मी काय स्पीडने गुंडाळणार आहे हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलंच. कर्जतला शंकर आम्हाला भेटला. कर्जतलाच पावसाची जोरदार सर आली. पावसात भिजत टपरीवर चहा-बिस्किटे खाल्ली.
(फोटो सौजन्य:समिराज)
जामरूखला जाणारी ८.३० ची लाल परी पकडून आंबिवलीच्या रस्त्याला लागलो. आंबिवलीला पोहोचायला साधारण १ तास लागला. रस्ता लहान असला तरी उत्तम स्थितीत असल्याने सगळी हाडे सोबत घेऊन उतरलो. शंकरने एक डॉक्टर दांपत्य आणि त्यांच्या सहकारी मित्राने भटकंतीवर लिहिलेलं पुस्तक आणलं होतं. पुस्तकाचं नाव आठवत नाहीये. त्याचं मानसीच्या खणखणीत(!) आवाजात वाचन झालं. आणि पोस्ट मॉर्टेमही. शंकरला वाटत होतं की झक मारली आणि ह्यांना पुस्तक दिलं. पण त्या पुस्तकाचा पुढे किल्ल्यावर उपयोग झाला.


साधारण साडेनऊला आंबिवलीत उतरलो आणि न थांबता किल्ल्याकडे कूच केले. पहिल्याच फाट्यावर रस्ता चुकण्याची संधी मिळते पण शंकर आधी येऊन गेला असल्याने आम्ही डावीकडचा खडीचा रस्ता पकडला. सध्या महाराष्ट्र सरकार पेठ गावात जाण्यासाठी गाडीवाट तयार करत आहे. रस्त्याचं निम्मं-अर्ध काम झालेलं होतं त्यामुळे पेठ गावापर्यंत रस्ता चुकणे वगैरे काही शक्यच नाही.

चालताना पेठचा किल्ला उजवीकडे दिसतो. किल्ला आणि पेठ गाव ज्या डोंगरावर वसले आहे त्याच्या एका बाजूला प्रचंड कडा आहे. या कड्यावरून आजूबाजूला हिरवागार (विहंगमयी आणि विलोभनीय) परिसर न्याहाळता येतो.

(फोटो सौजन्य:समिराज)
पेठ गाव तसं लहान आहे. पण मुंबईकर आणि इतर ट्रेकर्सची येजा जास्त असल्याने एक व्यापारी टच आलेला आहे. त्यामुळे किल्ला कर्जतपासून बराच आत असला तरी माणसांची वर्दळ जाणवते.पेठ गावात एका हाटेल कम घरात जेवणाची ऑर्डर सांगून आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. एक पोरगा वाट दाखवायला आला होता. पण खरंतर वाटाड्या घ्यायची गरज नाही. गावातून किल्ला उजवीकडे ठेवत एक रस्ता जातो. एका मोठ्या दगडापाशी त्याला अजून एक फाटा फुटतो. तिथेही उजवी वाट पकडून वरच्या दिशेने चालत राहिले की भैरवनाथाची गुहा येते. हे इथे लिहिलंय तितकं सहज होत नाही. गुहेपर्यंत यायला तरी अर्धा पाऊण तास लागतो. एकदम खडी चढण असल्यामुळे दमछाक होते. गुहेत बरंच कोरीवकाम शिल्लक आहे. दगडी खांब आहेत. वटवाघळांचे अडडे आहेत. डोंट डिस्टर्ब अशी पाटी बाहेर लावून खुशाल उलटे लटकले होते.
गुहेच्या तोंडाशीच एक वाट किल्ल्याच्या पोटातून कोरलेल्या पायर्‍यांकडे जाते.एकसंध दगडात आतून कोरलेल्या पायर्‍या हे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ह्या पायर्‍यांमुळेच कोथळीगड हे नाव पडले आहे. या पायर्‍या आपल्याला किल्ल्याच्या टोकावर घेऊन जातात.वरती एक दरवाजा आणि एक पाण्याचं टाकं आहे. किल्ला मुख्यत्वे टेहळणीसाठी वापरात असल्याने वरती फार जागा नाही किंवा अवशेष नाहीत. सुदैवाने लवकर आल्यामुळे वर फार गर्दी नव्हती. भिमाशंकरचे डोंगर, पदरगड, घडीघडीला डोकावणारी हिरवाई आणि फेसाळते धबधबे आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. (डॉक्टर....प्लीज माफ करा). थोडा वेळ निवांत बसून परत पायर्‍या उतरून गुहेशेजारी आलो. पुस्तकात लिहील्याप्रमाणे किल्ल्याच्या सुळक्याला प्रदक्षिणा घालता येते. समिराज आणि शंकर थोडे अंतर पुढे जाऊन नक्की वाट आहे का हे पाहून आले. मग सगळ्यांनी किल्ल्याच्या कडेने एक फेरी मारली. फेरी मारताना किल्ल्याच्या दगडात कोरलेले पाण्याची आणि इतर बरीच मोठी टाकी लागली.
(फोटो सौजन्य:समिराज)
शस्त्रागार म्हणून यातील काही खोल्या कदाचित वापरात असाव्यात. निलेश हर्डीकर या नावाची एक श्रद्धांजलीची पाटीही तिथे होती. एक क्षण मन सुन्न झालं. पुढे एक गुहा लागते आणि किल्ल्याची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण होते.

पूर्ण फेरी मारून झाल्यावर बिलकुल न थांबता सरळ पेठ गावात आलो. वाटेत चिकार पब्लिक होतं. जसं आर्मीवाल्यांना सिविलियनबद्दल वाटतं तसंच काहीसं निव्वळ फालतू टाईमपास करायला किल्ल्यावर येणार्‍या सो कॉल्ड मॉडर्न पब्लिकबद्दल आम्हाला वाटत होतं. पेठच्या किल्ल्याच्या गुहेपर्यंत जाऊन वरती न जाणारे लोक इतरांनाही तसंच करायचा सल्ला देत होते हे पाहून आश्चर्य वाटलं. देवा, पुढच्या वेळी त्यांना माथेरान किंवा कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये जाण्याची बुद्धी दे. जाऊदे. पप्पू शांत हो.


पेठ गावात विहिरीतून पाणी शेंदून हात पाय धुतले. ताजेतवाने होऊन जेवायला बसलो. मस्त तांदळाची मस्त भाकरी, बटाटा-वाटाणा(याला आलूमटरही म्हणतात), कोबी, पापड, लोणचं पोट भरून खाल्लं आणि परत निघालो. पावसाने जोरदार सलामी दिली. तसेच भिजत परतीची वाट चालू लागलो.

एका तासात आंबिवली गावात आलो. शंकरच्या आग्रहास मान देऊन आम्ही नदीकाठची पांडवलेणी बघायला गेलो. साधारण दोन-तीन किलोमीटर चालणे असावे. पण रस्ता डांबरी आहे. लेण्याची गुहा प्रचंड मोठी आहे आत वेगवेगळ्या खोल्या आणि मूर्त्या आहेत. पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. कोरीवकाम फार नसलं तरी एकंदरीत परीसर विलोभनीय आणि विहंगमयी आहे. (:-)).

नदीच्या पाण्यात पाय सोडून १०-१५ मिनीटे निवांत पडलो. ५ वाजताची बस पकडायची असल्याने परत फिरलो. आंबिवलीतून एका तासात लेणी पाहून सहज परत येता येते.


आंबिवलीला ५.३० ला येणारी लालपरी ६ वाजेपर्यंत आलीच नाही. शेवटी ७.४० ची सिंहगड एक्स्प्रेस चुकू नये म्हणून टमटमने कर्जतला आलो. टमटम अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचली तरीही वाटेत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असल्याने तिच्या वेगाला लगाम घातला गेला. १० मिनिटासाठी डेक्कन क्विन चुकली. फार हळहळ न करता फणसाचे गरे, मक्याच्या कणसांचा आस्वाद घेत गाडीची वाट बघू लागलो. वेळेच्या पाच मिनिटे आधीच सिंहगड आली. बसायला जागा मिळाल्याने मानसी खूपच खूश दिसत होती. रात्री साडेनऊच्या आत शिवाजीनगरला परत आलो ही सुद्धा एक कौतुकास्पद गोष्ट होती. रोहितला शिवाजीनगरहून डायरेक्ट पर्वती पायथा रिक्शा मिळाली ही दुसरी अवर्णनीय गोष्ट.


पेठचा किल्ला किंवा कोथळीगड बघायचा हे एक वर्षापासून मनात होते. किल्ला सुंदर आहे. आंबिवली-पेठ रस्ता बांधून डांबरी व्हायच्या आत लवकर बघून या. :-)
Labels:

Tuesday, June 10, 2008

राजमाची

राजमाची ट्रेकला जाऊन आलो त्याला आता एक आठवडा होत आला पण त्या ट्रेकची नशा काही अजून उतरली नाहीये. आमच्यापैकी कोणालाच नक्की रस्ता माहीत नव्हता. फक्त मधुरा एकदा राजमाचीला जाऊन आली होती तेही लोणावळामार्गे. स्वत:च स्वत:चा रस्ता शोधत केलेला हा पहिलाच ट्रेक होता. पण रस्ता माहीत नसल्याची चिंता न करता आम्ही सर्व जण ट्रेकला बाहेर पडलो होतो.

सकाळी ११ वाजताची पुणे-कर्जत पॅसेंजर पकडून आम्ही तेरा जण ठाकूरवाडीला निघालो. मध्ये लोणावळ्याला राजदीप आणि निलम मुंबईहून येऊन मिळाले. गाडीत सर्वांनी फरसाण, केळ्याचे वेफर्स, उकडलेल्या शेंगा फस्त केल्या. साधारण दोन वाजता आम्ही ठाकूरवाडीला पोहोचलो. खरेतर डोंगराच्या डाव्या बाजूला सिग्नल असल्यामुळे गाडी थांबते. तेव्हढ्यात उतरून घ्यावे लागते. खूपजण उतरणार असतील तर ड्रायव्हरला पुण्यातच सांगून ठेवले तर गाडी थोडावेळ अजून थांबते. ;-) उतरल्या उतरल्या समोर डोंगरावर जाणारा एक जुना लोहमार्ग दिसतो. त्याने शंभर एक मीटर वर गेले की उजवीकडे एक बोगदा लागतो. बोगद्यातून डोंगराच्या उजव्या बाजूला आले की समोर ठाकूरवाडी दिसते आणि दूरवर राजमाचीचा मनरंजन बालेकिल्ला.

ठाकूरवाडीला लागून असलेल्या शेतातल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही बैठक मारली. भाग्यश्रीने तिच्या मेसमधून आणलेली गवारीची आणि चन्याची भाजी सगळ्यांनी दणकून हाणली. निलेशने भोपळ्याचे घारे आणले होते आणि राजदीपने श्रीखंड आणून स्वीट डीशचा बंदोबस्त केला होता. जेवण झाल्यावर गावात जाऊन रस्ता विचारला. मावशीने "एक डोंगर उतरून पुढचा डोंगर पार केला की उल्हास नंदी(नदी) लागेल तिथे मुंडवाडी आहे. तिथं गेल्यावर पुढचा रस्ता तिथलं कोणीही सांगेल" असं सांगितलं. दुपारचे तीन वाजले होते आणि किल्ल्यावर पोहोचायला ७ वाजतील अस अंदाज आल्यामुळेआम्ही आपापल्या बॅगा पाठीवर टाकल्या आणि वाटेला लागलो.

ठाकूरवाडी मागे टाकून पुढचा डोंगर घसरत पडत उठत तासाभरात उतरलो. उन्हाचा चटका जाणवत होता. एका टेकडीवरून उल्हास नदीचे पात्र दिसत होते. अगदी पूर्ण भरलेले नसले तरी पोहण्याइतके पाणी तर नक्कीच होते. वाटेत आडव्या आलेल्या करवंदाच्या जाळीत हात घालत पटापट करवंदे तोंडात टाकत नदीकडे धावलो. तास-दीड तास चालल्याचा सगळा शीण पाण्यात वाहून गेला. पंधरावीस मिनिटे अजून आराम केल्यावर मुंडवाडी गावातल्या हापशीवर पाणी भरुन घेतले आणि पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झालो.

गावातल्या लोकांनी दाखावलेल्या पायवाटेने किल्ल्यावर जायला निघालो. मनरंजनच्या बरोबर मध्यावर एक पांढरे घर दिसते. त्याचे व्हाईट हाऊस असे नामकरण करून त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्ता सुरुवातीला सरळसोट होता. पण लवकरच दर दोन मिनिटाला रस्त्याला दोन-दोन तीन-तीन फाटे फुटू लागले. आणि त्यातल्या त्यात बरी दिसणारी पायवाट पकडून चालत राहिलो. पुढची वाट दिसत नसे तेव्हा आमच्यापैकी कोणीतरी पुढे जाऊन रस्त्याचा काही माग दिसतो का याची खात्री करत असे. तेवढ्यात एक म्हातारबाबा मुंडवाडीकडे जाताना दिसले. त्यांना राजमाची गावची वाट विचारून घेतली. सूर्य पाठीवर घेऊन बराच वेळ चढत राहिलो. आता वाट तर बरोबर होती पण बऱ्याच वेळा खडी चढण होती.बहुतेक वेळा पावसाळ्यात रोंरावत वाहणाऱ्या ओढयाचा रस्ता चढावा लागत होता. उन्हामुळे सर्वांचीच दमछाक होत होती. जवळचे पाणी पुरवून पुरवून पीत होतो. बरोबर ७ वाजता एका पठारावर पोहोचलो. तिथे डावीकडे गणपतीचे पत्र्याचे मंदीर होते. पण पुढची वाट काही दिसत नव्हती. सूर्यदेव विश्रांतीसाठी त्यांच्या पश्चिमेच्या घरी निघून गेले.

राजमाची गावाचा आणि किल्ल्याचाही काही पत्ता नव्हता. पण मोबाईलला रेंज होती. आमची राजमाची गावात राहण्याची सोय केलेल्या श्री. तुकाराम उंबरे यांच्याशी मंदार आणि मधुराने संपर्क साधला. पठारावरच्या गणपतीची खूण सांगून त्यांना आम्ही नेमके कुठे आहोत हे सांगितले. उंबरेंनी पठारावरून वर येणारी वाट पकडायला सांगितली. त्याचबरोबर राजमाचीतून दोन जणांना आम्हाला वाट दाखवण्यासाठी पाठवले. अंधार हळूहळू जंगलावर पसरत होता. पूर्ण अंधार पडण्याआधी राजमाची गावात पोहोचणे आवश्यक होते. पण ते आता शक्य नव्हते. बराच वेळ गर्द झाडीतून खडी चढण चढल्यावर आम्हाला उबरेंनी पाठवलेले दोघेजण भेटले. सुदैवाने ते दोघे पाण्याचे दोन मोठे कॅन घेऊन आले होते. ८ वाजले होते. व्यवस्थित अंधार पडला होता पण उंबरेंची माणसे बरोबर असल्याने आम्ही निश्चिंत होतो.

थोडावेळ थांबून ताजेतवाने होऊन राजमाचीकडे निघणार इतक्यात समोरची झाडे एकदम चांदण्यासारखी चमचमली. अगणित काजव्यांचे थवे ती झाडे उजळून टाकत होते. असं काही आयुष्यात पहिल्यांदाच पहात असल्याने प्रत्येकजण थक्क झाला होता. पाच तास सलग चालल्याची परतफेड झाली होती. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा असे वाटून गेले. काजव्यांचा खेळ पहात अंधारात ठेचकाळत एकदाचे राजमाची गावात पोचलो. राजमाची गावात राहण्याची जेवणाची चांगली सोय आहे. आमच्या ट्रेक लीडरने म्हणजे भाग्यश्रीने आधीच हे नियोजन करून ठेवलं होतं. तुकाराम उंबरेंकडे रात्रीचे जेवण झाले. तांदळाची भाकरी, तुरीची डाळ(वरण), फ्लॉवर-बटाट्याची भाजी, कांदा, लोणचे, पापड असा फक्कड बेत होता. गावाकडचं गूळ न घातलेलं वरण आणि भात काही खासंच होता. गावाला लागूनच असलेल्या एका सरकारी योजनेच्या रेस्ट हाऊसमध्ये आमची झोपण्याची व्यवस्था केलेली होती. सकाळच्या नाष्त्याची ऑर्डर देऊन आम्ही रेस्ट हाऊसवर आलो.

रेस्टहाऊसच्या कट्ट्यावर बरोबर आणलेल्या स्लीपिंग मॅट आणि ताडपत्र्या अंथरल्या आणि आडवे झालो. तेवढ्यात नितीनने गिटार काढले आणि ती शनिवारची रात्र एक अविस्मरणीय रात्र बनली. त्यानंतर जवळ जवळ चार-पास तास मोकळ्या आकाशाखाली मैफल रंगली होती. नितीन गिटार वाजवत होता. कधी मंदार कधी वर्षा तर कधी सर्वजण एकत्र गाण्यांमागून गाणी म्हणत होतो. रेस्ट हाऊस गावाबाहेर असल्याचा फायदा झालाच. "रुबरु रोशनी" गाण्याच्या वेळी सर्वांनी घेतलेला आलाप अजूनही तसाच ऐकू येतोय. दोन एक वाजता नितीनच्या बोटातल्या जादूला सलाम करून आम्ही झोपायला गेलो. काहीजण तिथेच कट्ट्यावर आडवे झाले. डोळ्याला डोळा लागतो ना लागतो तोच पावसाने वर्दी दिली. धडाधड सगळे धडपडत आत आलो आणि पत्र्यावर होणारा पावसाचा आवाज ऐकत थकलेल्या पायांकडे दुर्लक्ष करत झोपून गेलो.

सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात सकाळचे विधी उरकून घेतले. सकाळी दोन दोन प्लेटा पोह्यांचा फडशा पाडला. गावाच्या शेजारी महादेव मंदीर आहे आणि तिथेच एक बंधारा आहे. पुन्हा एकदा पाण्यात मनसोक्त डुंबून घेतले. महादेवाचे दर्शन घेतले तोपर्यंत सगळे तयार झालेच होते. सकाळचे ९ वाजले होते. दोन्ही बालेकिल्ले चढून जेवून पुन्हा पुण्याला ८ वाजायच्या आत परत येणे अशक्य वाटत होते. म्हणून फक्त मनरंजनला जाऊन यायचे ठरले. राजमाची गावातून मनरंजनला जायला फक्त १५-२० मिनिटे लागली. श्रीवर्धन आणि मनरंजनच्या बरोबर मध्ये पायथ्याशी भवानी मंदीर आहे. तेथून श्रीवर्धनला जायला वाट आहे. तसेच लोणावळ्याहून येणारी वाटही तिथेच मिळते. मनरंजनहून कर्नाळा, ढाकबहिरी, लोणावळा, नागफणी दिसते. उल्हास नदीचे खोरे पावसाळयात याहूनही सुंदर दिसत असणार असं वाटलं आणि पावसाळ्यात पुन्हा इथे यायचा बेत पक्का केला.

मनरंजनहून खाली आल्यावर जेवणात ट्रेकर्सचा नेहमीचा मेनू समोर होताच. पिठलं भाकरी कांदा पोटभर खाल्ल्यावर थोडावेळ तिथेच लुडकलो. भर दुपारी १ वाजता परत उतरायला सुरुवात केली. गावातल्या लोकांनी पठारावरच्या गणपतीच्या शेजारून उजवीकडची वाट घेतली तर लवकर कोंदिवड्यात पोहोचाल असे सांगितले. तेव्हा कोंदिवडे मार्गे कर्जतला पोहोचायचे असे ठरवले. पण ते इतक्या सहज होणार नव्हते. आदल्या रात्री अंधारात चालल्यामुळे राजमाची गावातून निघालेली वाट एका वळणावर चुकलो आणि भरकटलो. थोडा वेळ चालल्यावर ही मनरंजनला वळसा घालून लोणावळ्याला जाणारी वाट आहे हे लक्षात आले. पुन्हा माघारी फिरून त्या चुकलेल्या वळणावर दुसरी वाट पकडली. आता मात्र न चुकता पठारावरच्या गणपतीकडे सुखरूप आलो. तेथून कोंदिवड्याकडे जाणारे बाण दाखवले होते. दर पाच एक मिनिटांनी मोठ्या दगडांवर असे बाण होते. एका ठिकाणी मात्र बाणाचा दगड नव्हता आणि पायवाटही संपली होती.

जवळजवळ अर्धे अंतर उतरलो होतो. समोर दिसणार्‍या उल्हास नदीच्या दिशेने पाण्याच्या ओहोळातून खाली उतरत राहिलो. एका ठिकाणी ओहोळ अचानक संपला आणि खोल कडा लागला. वाट संपली. मग स्नेहल, मधुरा, सुप्रिया आणि मी वाट शोधण्याच्या मागे लागलो. तोपर्यंत सगळे एका पांढर्‍या झाडापाशी येऊन थांबले. या झाडाच्या मुळ्याही पांढर्‍या असतात. याला भुताचे झाड किंवा घोस्ट ट्री असे म्हणतात असे आमच्यापैकी कोणीतरी सांगितले. एका कोरड्या धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला चिंचोळी वाट होती. वाट किंचित अवघड होती पण पर्याय नव्हता. तिथून खाली उतरल्यावर धबधब्याकडे वळून पाहताना आत कोरलेली लेणी दिसली. आम्ही कोंडाण्याच्या लेण्याच्या अगदी जवळ होतो. पण वेळेअभावी सर्वाना काही तिकडे जाता आलं नाही. आधी उतरलेल्यांपैकी स्नेहल मात्र पटकन लेणी पाहून आला.

वाटेवर वाळलेल्या पानांचा खच पडला होता. त्यातच पाय देत, काटेकुटे बाजूला सारत आम्ही खाली उतरू लागलो. दिशा दाखवणारे बाण तर कधीच संपले होते. त्यातच एका ओहोळात होती ती पण पायवाट संपली. मग तसेच खाली उतरत राहिलो आणि अचानक मुंडवाडीत पोहोचलो. संध्याकाळचे पाच वाजले होते. कोंदिवड्यात लवकरात लवकर पोहोचायचे होते. पण उन्हाच्या तडाख्याने सगळे थकून गेले होते. हापशीवर पोटाला तडस लागेपर्यंत पाणी पिऊन सगळे तिथेच अर्धा तास आडवे झाले. नंतर मात्र मुंडवाडीतून कोंडाणे मार्गे कोंदिवड्याला जाणारी गाडीवाट पकडली. कोंदिवड्यात श्री गोगटेंकडे दोन सहा सीटर सांगितल्या. कर्जतकडे धावणार्‍या सहा सीटरमधून राजमाचीचा मनरंजन पहात होतो. दोन दिवसाचा ट्रेक एकदम धडाक्यात संपन्न होत होता.

Labels: ,

Thursday, May 22, 2008

क्लिक क्लिकः १

या लेखात बरेच इंग्रजी शब्द आलेले असतील. त्या शब्दांना सारखाच शब्द मराठीत असेल तर तो सांगितल्यास मला पुढच्या वेळी तो माहीत असेल. फोटोला छायाचित्र म्हणण्याऐवजी प्रकाशचित्र म्हणणे मला पटते पण् त्याचा वापर करणे सुटसुटीत वाटले नाही.


१. रूल ऑफ थर्डः चित्राचे कंपोझिशन हा चित्र चांगलं दिसण्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्वसाधारणपणे रुल ऑफ थर्ड आपल्याला चांगले कंपोझिशन मिळवून देतो. चित्रातला जो भाग आपल्याला महत्त्वाचा वाटतो तो भाग खालील चार लाल ठिपक्यांवर किंवा उभ्या वा आडव्या रेषांवर आला पाहिजे.उदा: हा फोटो पहा.


बैलगाडी उजव्या कोपर्‍यात आहे. ह्या ऐवजी जर मी बैलगाडी मध्यभागी ठेवून फोटो काढला असता तर तो तितका सहज वाटला नसता. आपल्या स्वाभाविकपणे महत्त्वाची गोष्ट मध्ये ठेवावीशी वाटते. पण फोटोमध्ये १/३ अंतरावरच्या रेषा आणि लाल बिंदू नजरेत लगेच भरतात.

किंवा हा२. कंपोझिशनचे इतर नियम (कर्ण, मध्य वगैरे): कधी कधी स्वतःच्या डोळ्यांना जे सुंदर दिसते पटते ते करावे. पण अशा गोष्टी कधी कधीच चांगल्या दिसतात. (चांगलं वाईट आपण फोटो कोणासाठी काढतोय त्याने/त्यावर ठरवा.)

आता हा फोटो पहा :


मध्ये पडलेलं जे झाड आहे ते बरोबर कर्णावर आहे. (मराठीत हे सगळं अवघड जातंय.) हे मला फोटो काढल्यावर कळालं ;-) पण तोही एक थंब रूल आहेच. नवीन नवीन प्रकारे फोटो काढतच आपण शिकतो.

किंवा हा फोटो पहा: यात ढग फोटोच्या मध्ये आहे.


खालील फोटो जरासा चुकला आहे. सममिती (सिमेट्री ) पाळली असती तर परिपूर्ण झाला असता.


३. नवीन कोन/दृष्टिकोन/अँगल्सः फोटो घेताना नवनवीन अँगलमधून फोटो काढा. डिजीटल कॅमेर्‍यामुळे आपल्याला वाट्टेल तेवढे फोटो काढता येतात. (;-) मी काही नवीन सांगत नाही). वरचा आकाश नावाचा फोटो पहा. यात मी खाली बसून वाळलेल्या झाडाझुडपांच्या काड्यांतून वर बघत हा फोटो काढला आहे.

तसाच हा फोटो पहा: यात राजांच्या उजवीकडे पायाशी बसून फोटो काढला आहे. एक वेगळा कोन आणि नेहमीपेक्षा वेगळा फोटो. :-)४. जवळ जा: थांबा. जा म्हटलं की निघाला? ज्याचा फोटो काढायचा त्याच्या शक्य तितक्या जवळ जा. काही वेळा हे शक्य नसते. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की करून बघा. घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंचेही सुंदर फोटो येतात.

उदा: ह्या रुल ऑफ थर्ड सुद्धा वापरलाय पहा. पण मुलीच्या लक्षात आले असते तर मला थर्ड लागला असता. या फोटोचे सौजन्य तिचेच आहे असे म्हणायला हरकत नाही. पण असं शक्यतो करू नये. विचारल्याशिवाय फोटो काढू नये. हाही एक नियमच आहे.

५. शटर स्पीडः शटर स्पीड कमी ठेवून एखाद्या गतिमान वस्तूची गती दाखवता येते. उदा. एखादा धबधबा आहे आणि १/१००० सेकंद शटर स्पीड ठेवून फोटो काढलात तर पडणारे पाणी जणू स्तब्ध झाले आहे असे दिसेल. पण ते तसे असत नाही म्हणून शटर स्पीड १/२०० किंवा थोडे कमीजास्त करून पाण्याचा वाहतेपणा दाखवता येऊ शकतो.

उदा: पळणारे खेळाडू, गाड्या, चक्रे वगैरे गोष्टींची गती फोटोत दिसली तर तो फोटो अधिक सहज काढलेला आणि वास्तवदर्शी वाटतो.
किंवा


हे आणि असे बरेच काही. याला नियम न म्हणता सल्ले म्हटलं तरी चालेल. कारण ह्या गोष्टी वारंवार प्रत्यक्ष करून शिकायच्या असतात. तसेच हे केले तरच फोटो चांगले येतात असं काही नाही. किंवा वर दिलेले माझे फोटो मला चांगले वाटले पण दुसर्‍याला वाटतीलच असं नाही. वरचे फोटो त्या त्या नियमाची उदाहरणे म्हणून ठीक आहेत. शेवटी महत्त्वाचे : नियम तोपर्यंत पाळा जोपर्यंत तुम्हाला ते कधी तोडायचे हे समजत नाही .

खालील दोन संकेतस्थळे उपयुक्त आहेत.
नॅशनल जिऑग्रफिक
डिजिटल फोटोग्राफी स्कूल

अभिजित...

Labels: