Tuesday, July 15, 2008

कोथळीगड

आदल्या दिवशीपर्यंत नक्की माहीत नव्हतं की ट्रेकला कोणकोण येणार आहे. विशाल, शंकर, मानसी, रोहीत, मी आणि समिराज नक्की येणार होतो. माझे आणि रोहितचे काही मित्र आणि मैत्रिणीपण येणार होत्या. त्यामुळे जरा खुशीत होतो. पण हळू हळू एक एक पत्ता गळत गेला आणि शेवटी आम्हीच सहाजण उरलो. नेहमीप्रमाणे आले ते मावळे आणि उडाले ते कावळे अशी घोषणा मनातल्या मनात करून वाटेला लागलो. सकाळी ६.१० ची सिंहगड यक्स्प्रेस पकडली आणि कर्जतला ८ वाजता उतरलो. हा लेख मी काय स्पीडने गुंडाळणार आहे हे सूज्ञांच्या लक्षात आले असेलंच. कर्जतला शंकर आम्हाला भेटला. कर्जतलाच पावसाची जोरदार सर आली. पावसात भिजत टपरीवर चहा-बिस्किटे खाल्ली.
(फोटो सौजन्य:समिराज)
जामरूखला जाणारी ८.३० ची लाल परी पकडून आंबिवलीच्या रस्त्याला लागलो. आंबिवलीला पोहोचायला साधारण १ तास लागला. रस्ता लहान असला तरी उत्तम स्थितीत असल्याने सगळी हाडे सोबत घेऊन उतरलो. शंकरने एक डॉक्टर दांपत्य आणि त्यांच्या सहकारी मित्राने भटकंतीवर लिहिलेलं पुस्तक आणलं होतं. पुस्तकाचं नाव आठवत नाहीये. त्याचं मानसीच्या खणखणीत(!) आवाजात वाचन झालं. आणि पोस्ट मॉर्टेमही. शंकरला वाटत होतं की झक मारली आणि ह्यांना पुस्तक दिलं. पण त्या पुस्तकाचा पुढे किल्ल्यावर उपयोग झाला.


साधारण साडेनऊला आंबिवलीत उतरलो आणि न थांबता किल्ल्याकडे कूच केले. पहिल्याच फाट्यावर रस्ता चुकण्याची संधी मिळते पण शंकर आधी येऊन गेला असल्याने आम्ही डावीकडचा खडीचा रस्ता पकडला. सध्या महाराष्ट्र सरकार पेठ गावात जाण्यासाठी गाडीवाट तयार करत आहे. रस्त्याचं निम्मं-अर्ध काम झालेलं होतं त्यामुळे पेठ गावापर्यंत रस्ता चुकणे वगैरे काही शक्यच नाही.

चालताना पेठचा किल्ला उजवीकडे दिसतो. किल्ला आणि पेठ गाव ज्या डोंगरावर वसले आहे त्याच्या एका बाजूला प्रचंड कडा आहे. या कड्यावरून आजूबाजूला हिरवागार (विहंगमयी आणि विलोभनीय) परिसर न्याहाळता येतो.

(फोटो सौजन्य:समिराज)
पेठ गाव तसं लहान आहे. पण मुंबईकर आणि इतर ट्रेकर्सची येजा जास्त असल्याने एक व्यापारी टच आलेला आहे. त्यामुळे किल्ला कर्जतपासून बराच आत असला तरी माणसांची वर्दळ जाणवते.



पेठ गावात एका हाटेल कम घरात जेवणाची ऑर्डर सांगून आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. एक पोरगा वाट दाखवायला आला होता. पण खरंतर वाटाड्या घ्यायची गरज नाही. गावातून किल्ला उजवीकडे ठेवत एक रस्ता जातो. एका मोठ्या दगडापाशी त्याला अजून एक फाटा फुटतो. तिथेही उजवी वाट पकडून वरच्या दिशेने चालत राहिले की भैरवनाथाची गुहा येते. हे इथे लिहिलंय तितकं सहज होत नाही. गुहेपर्यंत यायला तरी अर्धा पाऊण तास लागतो. एकदम खडी चढण असल्यामुळे दमछाक होते. गुहेत बरंच कोरीवकाम शिल्लक आहे. दगडी खांब आहेत. वटवाघळांचे अडडे आहेत. डोंट डिस्टर्ब अशी पाटी बाहेर लावून खुशाल उलटे लटकले होते.
गुहेच्या तोंडाशीच एक वाट किल्ल्याच्या पोटातून कोरलेल्या पायर्‍यांकडे जाते.एकसंध दगडात आतून कोरलेल्या पायर्‍या हे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ह्या पायर्‍यांमुळेच कोथळीगड हे नाव पडले आहे. या पायर्‍या आपल्याला किल्ल्याच्या टोकावर घेऊन जातात.



वरती एक दरवाजा आणि एक पाण्याचं टाकं आहे. किल्ला मुख्यत्वे टेहळणीसाठी वापरात असल्याने वरती फार जागा नाही किंवा अवशेष नाहीत. सुदैवाने लवकर आल्यामुळे वर फार गर्दी नव्हती. भिमाशंकरचे डोंगर, पदरगड, घडीघडीला डोकावणारी हिरवाई आणि फेसाळते धबधबे आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. (डॉक्टर....प्लीज माफ करा). थोडा वेळ निवांत बसून परत पायर्‍या उतरून गुहेशेजारी आलो. पुस्तकात लिहील्याप्रमाणे किल्ल्याच्या सुळक्याला प्रदक्षिणा घालता येते. समिराज आणि शंकर थोडे अंतर पुढे जाऊन नक्की वाट आहे का हे पाहून आले. मग सगळ्यांनी किल्ल्याच्या कडेने एक फेरी मारली. फेरी मारताना किल्ल्याच्या दगडात कोरलेले पाण्याची आणि इतर बरीच मोठी टाकी लागली.
(फोटो सौजन्य:समिराज)
शस्त्रागार म्हणून यातील काही खोल्या कदाचित वापरात असाव्यात. निलेश हर्डीकर या नावाची एक श्रद्धांजलीची पाटीही तिथे होती. एक क्षण मन सुन्न झालं. पुढे एक गुहा लागते आणि किल्ल्याची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण होते.

पूर्ण फेरी मारून झाल्यावर बिलकुल न थांबता सरळ पेठ गावात आलो. वाटेत चिकार पब्लिक होतं. जसं आर्मीवाल्यांना सिविलियनबद्दल वाटतं तसंच काहीसं निव्वळ फालतू टाईमपास करायला किल्ल्यावर येणार्‍या सो कॉल्ड मॉडर्न पब्लिकबद्दल आम्हाला वाटत होतं. पेठच्या किल्ल्याच्या गुहेपर्यंत जाऊन वरती न जाणारे लोक इतरांनाही तसंच करायचा सल्ला देत होते हे पाहून आश्चर्य वाटलं. देवा, पुढच्या वेळी त्यांना माथेरान किंवा कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये जाण्याची बुद्धी दे. जाऊदे. पप्पू शांत हो.


पेठ गावात विहिरीतून पाणी शेंदून हात पाय धुतले. ताजेतवाने होऊन जेवायला बसलो. मस्त तांदळाची मस्त भाकरी, बटाटा-वाटाणा(याला आलूमटरही म्हणतात), कोबी, पापड, लोणचं पोट भरून खाल्लं आणि परत निघालो. पावसाने जोरदार सलामी दिली. तसेच भिजत परतीची वाट चालू लागलो.

एका तासात आंबिवली गावात आलो. शंकरच्या आग्रहास मान देऊन आम्ही नदीकाठची पांडवलेणी बघायला गेलो. साधारण दोन-तीन किलोमीटर चालणे असावे. पण रस्ता डांबरी आहे. लेण्याची गुहा प्रचंड मोठी आहे आत वेगवेगळ्या खोल्या आणि मूर्त्या आहेत. पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. कोरीवकाम फार नसलं तरी एकंदरीत परीसर विलोभनीय आणि विहंगमयी आहे. (:-)).

नदीच्या पाण्यात पाय सोडून १०-१५ मिनीटे निवांत पडलो. ५ वाजताची बस पकडायची असल्याने परत फिरलो. आंबिवलीतून एका तासात लेणी पाहून सहज परत येता येते.


आंबिवलीला ५.३० ला येणारी लालपरी ६ वाजेपर्यंत आलीच नाही. शेवटी ७.४० ची सिंहगड एक्स्प्रेस चुकू नये म्हणून टमटमने कर्जतला आलो. टमटम अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचली तरीही वाटेत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असल्याने तिच्या वेगाला लगाम घातला गेला. १० मिनिटासाठी डेक्कन क्विन चुकली. फार हळहळ न करता फणसाचे गरे, मक्याच्या कणसांचा आस्वाद घेत गाडीची वाट बघू लागलो. वेळेच्या पाच मिनिटे आधीच सिंहगड आली. बसायला जागा मिळाल्याने मानसी खूपच खूश दिसत होती. रात्री साडेनऊच्या आत शिवाजीनगरला परत आलो ही सुद्धा एक कौतुकास्पद गोष्ट होती. रोहितला शिवाजीनगरहून डायरेक्ट पर्वती पायथा रिक्शा मिळाली ही दुसरी अवर्णनीय गोष्ट.


पेठचा किल्ला किंवा कोथळीगड बघायचा हे एक वर्षापासून मनात होते. किल्ला सुंदर आहे. आंबिवली-पेठ रस्ता बांधून डांबरी व्हायच्या आत लवकर बघून या. :-)




Labels:

5 Comments:

At 12:58 PM, July 15, 2008 , Anonymous Anonymous said...

sunder warNan..ani pictures suddha! to dagaDachya kaDela basalela photo danger aahe:-)

 
At 4:03 PM, July 15, 2008 , Blogger Unknown said...

Mast lihilay. Baslya-baslya trek la javun aalyasarkha watla :)

 
At 5:40 PM, July 15, 2008 , Blogger Yogesh said...

वरच्या दोघांसारखेच म्हणतो

 
At 6:10 PM, July 15, 2008 , Blogger HAREKRISHNAJI said...

Wounderful blog. There are many approaches to Bhimashakar from this region. I have gone to Bhimashakar via Kothligad during rainy season. One of the most remarkable trek.

 
At 8:47 AM, July 13, 2009 , Blogger Unknown said...

vyavasthit lihilay,
ekach suggestion, photo jar vegaLya tab kinva window madhe ughadle tar photo baghataanaa mukhya lekh najare aad honaar naahi. :)

--tu mhaNshil...aaLashi zaalaay lekaachaa.. punha backspace daabaNe suddha jivaavar yeta :)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home