Monday, August 04, 2008

भीमाशंकर: शिडी घाटातून

२६-२७ ला भीमाशंकरचा ट्रेक आहे. आण्णा म्हणाला. शिडी घाटातून आहे म्हटल्यावर मी जरा टरकलोच. ऑफिसचा ट्रेक काढायचा आहे असं थातूरमातूर कारण द्यायचा प्रयत्न केला. काही मित्रांना सांगितल्यावर क्षणार्धात 'लाइफटाईम ट्रेक आहे ऑफिसचा ट्रेक पुढे कधीतरी काढ' असं मत मिळालं. शेखर म्हणजेच आण्णाचा पटनी ट्रेक क्लब आणि धूमकेतू ट्रेकर्स मुंबई यांनी २६-२७ तारखेला भीमाशंकर ट्रेक आयोजित केला होता. पैसे वगैरे भरल्यावर ट्रेकला जाईपर्यंत एकच विचार सारखा सारखा डोक्यात होता. आपण एका खणखणीत ट्रेकला चाललो आहोत. मजा येणार आहे. उत्साह आणि हुरहूर यांचं अजब मिश्रण शरीरातून दौडत होतं.

शुक्रवारी रात्री पुण्याहून ५० जण कर्जतसाठी निघालो. मोठी बस होती त्यामुळे प्रवासात काही चिंता नव्हती. बसमध्ये एकमेकांच्या ओळखीने आलेले, कुणाचे नातेवाईक किंवा कोणी एकटे आलेले वगैरे सर्व प्रकारचे ट्रेकर्स एकत्र आले होते. साधारण दहा वाजता बस पिंपरीतून बाहेर पडली आणि अंताक्षरीची धमाल सुरु झाली. लोणावळ्याच्या घाटात धुक्याच्या दुलईतून बस हळूहळू पुढे सरकत होती. ड्रायव्हरला १० फुटासमोरचे काही दिसत नव्हते. कर्जतला धूमकेतू ट्रेकर्सची एक कार आम्ही खांडसचा रस्ता चुकू नये म्हणून सोबतीसाठी आली होती. त्यामुळे आम्ही वेळेवर पोहोचलो आणि पुरेशी झोपही मिळाली. मुंबईहून धूमकेतू सदस्य आणि ३० एक ट्रेकर्स अगोदरच आले होते. खांडसच्या प्राथमि़क शाळेत मुलांची आणि धूमकेतूचे एक सदस्य संतोष म्हसकर यांच्या घरात मुलींची राहण्याची सोय करण्यात आली होती. आता मस्त झोपू म्हणेपर्यंत मुलांच्या टवाळक्या सुरु झाल्या. कसेबसे हसे आवरत शाळेच्या पत्रावरचा पावसाचा आवाज ऐकत झोप कधी लागली समजलंच नाही.

सकाळी ६ वाजता उठून निसर्गाच्या सानिध्यात प्रातर्विधी आवरले. गाव तर आमच्या आधीच उठलेले होते. त्यामुळे गाईगुरांचा गजबजाट सुरु झालेला होता. तेवढ्यात पावसालाही सुरुवात झाली. गरमागरम पोहे आणि चहाचा नाष्टा करून खांडस गावातून शिडीघाटाकडे जाणार्‍या रस्त्याला लागलो. डांबरी रस्त्याने २-३ किलोमीटर चालत गेलं की एक आडवा रस्ता मिळतो. तिथून एक रस्ता गणेश घाटाकडे जातो. आडव्या रस्त्याच्या शेजारून वाहणार्‍या ओढ्याजवळून जाणारी पायवाट शिडीघाटाकडे जाते. येथून आपला ट्रेक चालू होतो.

सुरूवातीला धूमकेतूच्या सदस्यांनी सर्वांना एकत्र करून ट्रेक दरम्यान घ्यावयाची काळजी तसेच पर्यावरण रक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. पुण्यातला कचरा पुण्यात आणि मुंबईचा मुंबईला परत गेला पाहीजे हे कटाक्षाने पाळायला सांगीतले. एकूण ट्रेकर्स किती आहेत त्याचा काउंट घेऊन आम्ही श्रीगणेशा केला. दर दहा ट्रेकर्समागे एक धूमकेतू सदस्य होता त्यामुळे वाट चुकण्याचा काही धोका नव्हता.

पाऊस सतत पडतच होता आणि आजूबाजूला हिरवेगार डोंगर डोळ्यांना सुखद वाटत होते. तरीपण भीमाशंकरला जाण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे शिड्या नेमक्या किती अवघड आहेत याकडेच सगळे लक्ष होते. त्यातच आण्णाने ईमेलमध्ये काठिण्यपातळी ४/५ लिहिल्याने नाही म्हटली तरी हळूहळू का होईना छाती धडधडत होती. साधारण तासादीडतासात पहिली शिडी दृष्टीपथात आली. शिडीवरून साहजिकच एका वेळी एक जण जाऊ शकत होता. ९० जण सोबत असल्याने शिडी पार करायला बराच वेळ लागत होता.

पहिल्या दोन शिड्या एका शेजारी एक आहेत. पण शिड्यांपेक्षाही शिडी संपल्या संपल्या जे १०-१५ फुटाचे अंतर आहे ते जास्त अवघड वाटले. पहिली शिडी पार केल्या केल्या कड्याला लटकून यावे लागत होते. धूमकेतूचे सदस्य अशा सर्व अवघड ठिकाणी मार्गदर्शनाला होतेच. कड्याला लटकायचे होते त्या ठिकाणी तर पाय ठेवायला जागा नव्हती तेव्हा पाय ठेवण्यासाठी धूमकेतूच्या संजयसरांच्या आणि राणेसरांच्या पायाचा आधार घेऊन सर्व ट्रेकर्सनी तो पॅच पार केला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या शिडीनंतरही असेच अवघड पॅचेस होते. एके ठिकाणी आपल्याला शक्यच नाही असे पॅचेससुद्धा धूमकेतूच्या मार्गदर्शनाखाली सहज पूर्ण झाले. तीनही शिड्या चढल्यावर आपण एका सपाट जागी येतो. इथे ट्रेक संपत नाही उलट इथे एकूण ट्रेकपैकी फक्त ४० टक्केच अंतर पूर्ण होते. इथे उजवीकडून गणेशघाटाची वाट येऊन मिळते. थोडी विश्रांती आणि चहावगैरे झाल्यावर पुढची वाट चालू लागलो. पुढे बर्‍यापैकी उभी चढण आहे. एका वेळी एकच जण जाऊ शकेल अशी वाट आहे त्यामुळे मुंग्यांची रांग चालली असल्याप्रमाणे चित्र दिसत होते. कदाचित यामुळेच याला मुंगी घाट म्हणत असतील. मुंगी घाटात फार अवघड असे पॅचेस नाहीत पण बराच वेळ वर वर चढत रहावे लागते. घाट संपता संपता आपण कार्वीच्या घनदाट जंगलात पोहोचतो. सर्वत्र दाट धुक्याचा थर पसरला होता. इथे महाराष्ट्राचा राजप्राणी शेकरू खार दिसते. उंच उंच झाडांच्या शेंड्यात शेकरूचे घरटे दिसत होते. शेकरू ही खार असली तरी खारुताई म्हणता येईल इतकी छोटी नक्कीच नाही.

मुंगी घाटातून वर आल्यावर पाठीवरचे सामान टाकून दिले आणि हिरवाईवर स्वतःला झोकून दिले. सर्व जण पूर्ण चढून वर येईपर्यंत तिथेच बसून राहिलो. हळूहळू सगळे एकत्र आले. तिथून डावीकडच्या पायवाटेने साधारण १ वाजता भीमाशंकर देवस्थानात पोहोचलो. राहण्याची सोय मंदीरासमोर एक हॉटेल आले त्याला लागून असलेल्या हॉलमध्ये केलेली होती. प्रकाशसरांनी सर्वांना तिथे राहताना घ्यावयाची खबरदारी वगैरे बद्दल लेक्चर दिले. (:-) रविवारी सकाळी निघणार असल्यामुळे शनिवारचा उरलेला सर्व वेळ आमच्या हातात होता. सरांनी गुप्त भीमाशंकर वगैरे बघून आला तरी चालेल असे सांगीतले होते. पण मी आणि माझ्या काही मित्रांनी मस्त ताणून देणे पसंत केले. साधारण अडीच वाजता जेवण झाले. आणि आम्ही आधी केलं तेच परत म्हणजे मस्त झोप काढली.
संध्याकाळी बाहेर पडून मंदिरातल्या गर्दीचा अंदाज घेतला. कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो त्यामुळे मंदिराचे धुक्यातले फोटो काढता आले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे मंदीर साधारण १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे आहे. भक्कम दगडी बांधकाम आणि तितकीच बारकाईने केलेली कला कुसर एक वेगळाच आदर निर्माण करते. एखाद्या वजनदार व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव चहूबाजूला पडावा तसा या दगडी मंदिराचा प्रभाव सभोवारच्या वातावरणावर पडलेला होता. मंदिरासमोरच चिमाजीअप्पांनी वसईहून आणलेली घंटा आहे. बाजूलाच दीपमाळ आहे. श्रावणाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदीराचा जीर्णोद्धार वगैरे चालू होता. थोडा वेळ मंदिरातल्या पवित्र वातावरणात प्रसन्न होऊन पुन्हा हॉलमध्ये आलो.

आमचे मित्रवर्य सरकार उर्फ मंदार साठेने तेवढ्यात बाहेर जाऊन पत्ते विकत आणले होते. त्यामुळे संध्याकाळी मेंढीकोट, जजमेंटचे डाव रंगले. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये रिंगण करून बसले आणि गाण्यांचा पाऊस सुरु झाला. धूमकेतूचे योगेशसर, दीपक, म्हात्रेसर रंगात आले होते. एकामागून एक एक से एक गाणी सादर केली जात होती. गझल म्हणा, चित्रपटगीते म्हणा, मराठी कोळीगीते, हिंदी गाणी आणि त्यात 'आयचा घो', "रेलगाडी", "ओ बेवफा तू क्या जाने"वगैरेंची फोडणी. अशी बहारदार मैफल रंगली होती. फोटोग्राफर कंपनी फोटो काढण्याची एकही संधी सोडत नव्हती. जेवण झाल्यानंतर हळू हळू झोपेचा अंमल दिसू लागला आणि आम्ही पथार्‍या पसरल्या.

सकाळी ४ वाजताच जाग आली. बराच वेळ बाहेर भटकून पांघरूणात परत येऊन झोपलो. मग एकएकेक जण उठू लागले. सगळ्यांच आवरून होईपर्यंत पोहे चहा तयार होता. आण्णाने अपने हात से पेले भरे और मैने सबको वाटे. इसकी वजहसे चाय की चव बहुत अप्रतिम लगी. पोटोबा शांत झाल्यावर मार्चिंग ऑर्डर्स आल्या. काही जण सकाळी देवदर्शन करून आले. निघण्यापूर्वी ग्रुप फोटो झाले. ८०-९० लोक कसे फोटोत मावले देवास आणि माझ्या कॅमेर्‍यास ठाऊक.

परतीच्या वाटचाली आधी सर्व धूमकेतू मंडळींच्या पराक्रमाची ओळख करून देण्यात आली. बरेच लोक एनआयएम मधून मौंटेनिअरींग अ वर्गात पास झाले होते. कुणी ९० पिनाकल मारली होती तर कुणी काय तर कुणी काय. आपण तर ऐकूनच सपाट झालो होतो.

येताना मुंगी घाट उतरायला फार वेळ लागला नाही. टुणुक टुणुक उड्या मारतच उतरलो. फक्त दोन ग्रुपमध्ये खुप गॅप पडला की धुमकेतूच्या सरांचा ओरडा खावा लागायचा. सगळे एका टीमचा भाग आहोत हे वारंवार आमच्या मनावर बिंबवलं गेलं. मुंगी घाट संपल्यावर पुन्हा आपण गणेश घाट आणि शिडी घाटातून येणारे(म्हणजेच जाणारेही) रस्ते जिथे मिळतात तिथे पोहोचतो. सर्व जण मुंगी घाट उतरून येईपर्यंत तिथेच थांबून आम्ही गणेश घाटाच्या रस्त्याला लागलो. सुरुवातीला कमी असणारा उतार नंतर जाणवण्याइतका तीव्र होत गेला. थोड्या वेळाने आम्ही वळून अशा ठिकाणी पोहोचलो जिथून शिडी घाट दिसत होता. बर्‍याच ट्रेकर्सनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. 'हे आपण चढून गेलो होतो' यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. शिडीघाटाच्या कड्यावर धबधब्यांची रांग दिसत होती. त्यात दोन धबधब्यांच्या मधून ९० अंशात वर जाणारी चिंचोळी वाट होती. तिथे आमच्या सारखेच अजून काही बहाद्दर आपली क्षमता आजमावत होते.

गणेश घाटात गणेशाचे मंदीर आहे. तिथून रस्ता एक वळण घेतो आणि आत्तापर्यंत डोंगर डावीकडे ठेवून उतरणारे आपण डोंगर उजवीकडे ठेवून उतरतो. भोलेबाबाचा गजर करणारे काही भाविक वर येताना भेटत होते. तसा पावसाळ्यात हा रस्ता माणसांनी गजबजलेला असतो. पण रात्री किंवा इतर सुनसान वेळी या घाटात लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा ह्या घाटात एकटे दुकटे राहण्याऐवजी ग्रुपने मार्गक्रमण करावे. अखंड पाऊस अंगावर घेत गणेश घाट पूर्ण केला. घाट संपता संपता डांबरी रस्ता सुरु झाला. म्हणे वन विभागाच्या परवानगीसाठी डांबरी रस्त्याचे काम थांबले आहे. अन्यथा बहुतेक मुंगी घाटापर्यंत की गणेश मंदिरापर्यंत डांबरी रस्ता होणार आहे. (म्हणजे वाटच लागणार असं दिसतंय)

ज्या ठिकाणी खांडस गावातील रस्ता गणेश आणि शिडीघाटाला जाणार्‍या रस्त्याला येऊन मिळतो तिथे आमची बस उभी होती. चालून चालून मोडकळीस आलेल्या पायांनी निश्वास टाकला. श्री. म्हसकर यांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. व्यवस्था कसली राजेशाही थाट होता. झणझणीत तर्री असलेलं बटाट्या-वाटाण्याचं कालवण आणि कोकणी जाडा भात. वरणही स्पर्धेत होतं पण गुलाबजाम एकदम फक्कड होते. झटपट चालत (आणि बसने) सगळ्यांच्या पुढे आल्याने पहिल्या पंगतीचा मान मिळाला. पोटाला तडस लागेपर्यंत खाऊन बसमध्ये मागच्या सीटवर जाऊन आडवा झालो. सगळ्यांच जेवण वगैरे आटपेपर्यंत एक तासभर झोप झाली. साधारण तीन वाजता परतीचा प्रवास सुरु झाला. गाडीत दमचराड, दमशरारत की काय ते वगैरे खेळता खेळता गाडी पिंपरीत कधी घुसली कळालंच नाही. पुणेकर मंडळींचा संपर्कप्रमुख आण्णा उर्फ शेखर धुपकर यांना भावपूर्ण निरोप देऊन गाडी पुण्यात आली. एकेक जण टाटा-बायबाय करून उतरून गेला. अपना मकाम आ गया तो हम भी उतर गये. सोच रहे थे की मंजील ज्यादा खुबसुरत थी या रास्ते..



अभिजित

ट्रेकच्या फोटोंसाठी इथे भेट द्या


माझी चित्रशाळा: http://picasaweb.google.co.in/abhijit.yadav

Labels:

14 Comments:

At 1:35 PM, August 05, 2008 , Anonymous Anonymous said...

Apratim varnan ani apratim trek. I missed it..:(

 
At 2:20 PM, August 05, 2008 , Anonymous Anonymous said...

jhakaas!!! mast varnan kela ahe!!!

 
At 2:34 PM, August 05, 2008 , Anonymous Anonymous said...

पोष्ट एकदम कडक झाली आहे. अप्रतिम वर्णन! मस्त फोटो...दीर्घकाळ लक्षात राहील असा ट्रेक!

 
At 2:45 PM, August 05, 2008 , Blogger Unknown said...

Are mitra, Akadam zakkaaas Varnan kel aahe!!! Lai Bharriiii :)

 
At 5:17 PM, August 05, 2008 , Blogger CLICKSAGAR said...

Saglech Sundar aahe...........

 
At 8:59 PM, August 05, 2008 , Blogger अनिकेत भानु said...

लै भारी.
आमच्या अनुभवाची आठवण झाली.

कॉलेजात असताना लोकांनी नाही नाही म्हटलं असताना गाईड वगैरे न घेता गेलो होतो. ते मधे एका ठिकाणी असं वर खडकाला धरून जावं लागतं तिकडे सॉलिड फाटली होती. पण खाली उतरणं जास्त कठीण आहे असं म्हणून गेलो होतो पुढे. परत येताना गणेश घाटाने :)

अर्थात तुमच्याएवढा मोठा ग्रुप वर गेलाच कसा असं आश्चर्य वाटतंय. खरंच धूमकेतूचं काम कौतुकास्पद आहे....

 
At 6:56 AM, August 06, 2008 , Blogger Yogesh said...

mast re jhakaas

 
At 8:16 AM, August 06, 2008 , Blogger कोहम said...

jabaradasta.....

ShiDi ghaTachi maja kahi vegaLich aahe. asech posts Takat raha....amhala punarpratyayacha ananda miLat raheel

 
At 5:24 PM, August 06, 2008 , Blogger mandar_sathe2000 said...

Lai bhari...lai bheshhttt!!

 
At 11:35 AM, August 10, 2008 , Blogger HAREKRISHNAJI said...

या दिवसात भिमाशंकर म्हणजे स्वर्गच.
मी अनेक वाटांनी भिमाशंकरला गेलोय. शिडीवाटॆने सुद्धा

 
At 3:04 AM, August 19, 2008 , Blogger Nandan said...

sahi. photos, varNan donhi mast

 
At 12:47 PM, August 30, 2008 , Blogger TheKing said...

I knw it's an awesome trek. Had been there once during monsoon but through ganapati ghat. Your post reminded me of that great trek..

 
At 5:50 PM, December 06, 2009 , Blogger omkar said...

bhimashankar cha pravas virtually ghadla mala vachun

 
At 12:56 PM, April 20, 2019 , Blogger Ashish chauhan said...

best restaurant in delhi

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home