Monday, December 14, 2015

एक वेगळा सोहळा

एक वेगळा सोहळा …

हल्लीच पुण्यात एका लग्नाला जायचा योग आला. माझी एक विप्रो कंपनीमधली सहकारी पुन्हा लग्नबद्ध झाली. ती  गेली ५-६ वर्ष पुण्यात राहिलेली होती. गेल्या वर्षी ती  तिच्या अमराठी अतामीळ नवऱ्यासोबत लग्न करून चेन्नईला गेली होती . तिच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाले आणि तिला त्याच्यासोबत पुन्हा पुण्यात महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचे होते. आता तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे. आधीच चेन्नई पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात असताना एवढे उपद्व्याप करण्याचे कारण काय. पण त्यांनी ते केलं. त्यांच्या मनाला जे पटलं, जे योग्य वाटलं ते केलं. माझ्यासाठी तर हा निव्वळ सुखद अनुभव होता. वेळात वेळ काढून ऑफिसला जायची वाट  वाकडी करून त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो आणि बरंच  काही घेऊन आलो. कौतुक करावसं वाटतं या दोन कुटुंबांचं जे मुळात प्रेमविवाहालाही  तयार झाले आणि या पुनर्विवाहाच्या हट्टाला ही आनंदाने तयार झाले. सर्वांचे पुण्याविषयीचे प्रेम, मराठी पद्धतीने लग्न करायची इच्छा, पुरासारख्या आपत्तीतूनही निराश न होता सोहळा साजरा करण्याची जिद्द  यामुळे विवाहबंधनाचा स्मरणीय झालेला तो दिवस सर्वांच्या एकमेकासबंधी असलेल्या निष्ठेची, प्रेमाची आणि आदराची ग्वाही देतो. या कामी वर-वधूला सहकार्य केलेले त्यांचे सर्व परममित्र-मैत्रिणी आणि विवाहविधी संपूर्ण सुलभ हिंदी भाषांतरासहीत संपन्न केल्याबद्दल ज्ञानप्रबोधिनी पुणे येथील स्त्री-पुरोहितांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करावेसे वाटतात.

लग्नविधीचा एकेक श्लोक अर्थासहित ऐकण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात एकमेकांविषयी काय अपेक्षा असाव्यात, आचरण कसे असावे, तसेच आर्थिक बाबतीत पारदर्शकता असावी वगैरे अनेक गोष्टीची हमी श्लोकांतून लग्नावेळी एकमेकाना दिलेली असते याकडे माझे लक्ष वेधले गेले. अन्यथा वर-वधूसह किती जणांच लग्नात  "शुभमंगल सावधान" म्हटलं की अक्षता टाकायच्या आणि "मम" म्हणा म्हटलं की "मम" म्हणायचं यापलीकडे लक्ष असतं. त्यादिवशी मला आपलं काही चुकत असल्यास त्याची जाणीव झाली आणि काही बरोबर असल्यास हे अपेक्षित आहे म्हणून विनम्रता आली. पाश्चिमात्य देशात "ओथ  रिन्युवल" नावाचा एक विधी असतो. कदाचित या दोघांसाठी एक वर्षानंतर आणि माझ्यासाठी सात वर्षानी असंच काहीसं झालं असं म्हणायला हरकत नाही. जबाबदारी, प्रेम, विश्वास आणि सामंजस्यानं केलेली वाटचाल नक्कीच या दोन जीवांच्या आयुष्यात  परमोच्च समाधानाचे क्षण वारंवार आणेल. आणि तसे ते येवोत हीच शुभेच्छा.

--अभिजित यादव