Tuesday, June 10, 2008

राजमाची

राजमाची ट्रेकला जाऊन आलो त्याला आता एक आठवडा होत आला पण त्या ट्रेकची नशा काही अजून उतरली नाहीये. आमच्यापैकी कोणालाच नक्की रस्ता माहीत नव्हता. फक्त मधुरा एकदा राजमाचीला जाऊन आली होती तेही लोणावळामार्गे. स्वत:च स्वत:चा रस्ता शोधत केलेला हा पहिलाच ट्रेक होता. पण रस्ता माहीत नसल्याची चिंता न करता आम्ही सर्व जण ट्रेकला बाहेर पडलो होतो.

सकाळी ११ वाजताची पुणे-कर्जत पॅसेंजर पकडून आम्ही तेरा जण ठाकूरवाडीला निघालो. मध्ये लोणावळ्याला राजदीप आणि निलम मुंबईहून येऊन मिळाले. गाडीत सर्वांनी फरसाण, केळ्याचे वेफर्स, उकडलेल्या शेंगा फस्त केल्या. साधारण दोन वाजता आम्ही ठाकूरवाडीला पोहोचलो. खरेतर डोंगराच्या डाव्या बाजूला सिग्नल असल्यामुळे गाडी थांबते. तेव्हढ्यात उतरून घ्यावे लागते. खूपजण उतरणार असतील तर ड्रायव्हरला पुण्यातच सांगून ठेवले तर गाडी थोडावेळ अजून थांबते. ;-) उतरल्या उतरल्या समोर डोंगरावर जाणारा एक जुना लोहमार्ग दिसतो. त्याने शंभर एक मीटर वर गेले की उजवीकडे एक बोगदा लागतो. बोगद्यातून डोंगराच्या उजव्या बाजूला आले की समोर ठाकूरवाडी दिसते आणि दूरवर राजमाचीचा मनरंजन बालेकिल्ला.

ठाकूरवाडीला लागून असलेल्या शेतातल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही बैठक मारली. भाग्यश्रीने तिच्या मेसमधून आणलेली गवारीची आणि चन्याची भाजी सगळ्यांनी दणकून हाणली. निलेशने भोपळ्याचे घारे आणले होते आणि राजदीपने श्रीखंड आणून स्वीट डीशचा बंदोबस्त केला होता. जेवण झाल्यावर गावात जाऊन रस्ता विचारला. मावशीने "एक डोंगर उतरून पुढचा डोंगर पार केला की उल्हास नंदी(नदी) लागेल तिथे मुंडवाडी आहे. तिथं गेल्यावर पुढचा रस्ता तिथलं कोणीही सांगेल" असं सांगितलं. दुपारचे तीन वाजले होते आणि किल्ल्यावर पोहोचायला ७ वाजतील अस अंदाज आल्यामुळेआम्ही आपापल्या बॅगा पाठीवर टाकल्या आणि वाटेला लागलो.

ठाकूरवाडी मागे टाकून पुढचा डोंगर घसरत पडत उठत तासाभरात उतरलो. उन्हाचा चटका जाणवत होता. एका टेकडीवरून उल्हास नदीचे पात्र दिसत होते. अगदी पूर्ण भरलेले नसले तरी पोहण्याइतके पाणी तर नक्कीच होते. वाटेत आडव्या आलेल्या करवंदाच्या जाळीत हात घालत पटापट करवंदे तोंडात टाकत नदीकडे धावलो. तास-दीड तास चालल्याचा सगळा शीण पाण्यात वाहून गेला. पंधरावीस मिनिटे अजून आराम केल्यावर मुंडवाडी गावातल्या हापशीवर पाणी भरुन घेतले आणि पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झालो.

गावातल्या लोकांनी दाखावलेल्या पायवाटेने किल्ल्यावर जायला निघालो. मनरंजनच्या बरोबर मध्यावर एक पांढरे घर दिसते. त्याचे व्हाईट हाऊस असे नामकरण करून त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्ता सुरुवातीला सरळसोट होता. पण लवकरच दर दोन मिनिटाला रस्त्याला दोन-दोन तीन-तीन फाटे फुटू लागले. आणि त्यातल्या त्यात बरी दिसणारी पायवाट पकडून चालत राहिलो. पुढची वाट दिसत नसे तेव्हा आमच्यापैकी कोणीतरी पुढे जाऊन रस्त्याचा काही माग दिसतो का याची खात्री करत असे. तेवढ्यात एक म्हातारबाबा मुंडवाडीकडे जाताना दिसले. त्यांना राजमाची गावची वाट विचारून घेतली. सूर्य पाठीवर घेऊन बराच वेळ चढत राहिलो. आता वाट तर बरोबर होती पण बऱ्याच वेळा खडी चढण होती.बहुतेक वेळा पावसाळ्यात रोंरावत वाहणाऱ्या ओढयाचा रस्ता चढावा लागत होता. उन्हामुळे सर्वांचीच दमछाक होत होती. जवळचे पाणी पुरवून पुरवून पीत होतो. बरोबर ७ वाजता एका पठारावर पोहोचलो. तिथे डावीकडे गणपतीचे पत्र्याचे मंदीर होते. पण पुढची वाट काही दिसत नव्हती. सूर्यदेव विश्रांतीसाठी त्यांच्या पश्चिमेच्या घरी निघून गेले.

राजमाची गावाचा आणि किल्ल्याचाही काही पत्ता नव्हता. पण मोबाईलला रेंज होती. आमची राजमाची गावात राहण्याची सोय केलेल्या श्री. तुकाराम उंबरे यांच्याशी मंदार आणि मधुराने संपर्क साधला. पठारावरच्या गणपतीची खूण सांगून त्यांना आम्ही नेमके कुठे आहोत हे सांगितले. उंबरेंनी पठारावरून वर येणारी वाट पकडायला सांगितली. त्याचबरोबर राजमाचीतून दोन जणांना आम्हाला वाट दाखवण्यासाठी पाठवले. अंधार हळूहळू जंगलावर पसरत होता. पूर्ण अंधार पडण्याआधी राजमाची गावात पोहोचणे आवश्यक होते. पण ते आता शक्य नव्हते. बराच वेळ गर्द झाडीतून खडी चढण चढल्यावर आम्हाला उबरेंनी पाठवलेले दोघेजण भेटले. सुदैवाने ते दोघे पाण्याचे दोन मोठे कॅन घेऊन आले होते. ८ वाजले होते. व्यवस्थित अंधार पडला होता पण उंबरेंची माणसे बरोबर असल्याने आम्ही निश्चिंत होतो.

थोडावेळ थांबून ताजेतवाने होऊन राजमाचीकडे निघणार इतक्यात समोरची झाडे एकदम चांदण्यासारखी चमचमली. अगणित काजव्यांचे थवे ती झाडे उजळून टाकत होते. असं काही आयुष्यात पहिल्यांदाच पहात असल्याने प्रत्येकजण थक्क झाला होता. पाच तास सलग चालल्याची परतफेड झाली होती. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा असे वाटून गेले. काजव्यांचा खेळ पहात अंधारात ठेचकाळत एकदाचे राजमाची गावात पोचलो. राजमाची गावात राहण्याची जेवणाची चांगली सोय आहे. आमच्या ट्रेक लीडरने म्हणजे भाग्यश्रीने आधीच हे नियोजन करून ठेवलं होतं. तुकाराम उंबरेंकडे रात्रीचे जेवण झाले. तांदळाची भाकरी, तुरीची डाळ(वरण), फ्लॉवर-बटाट्याची भाजी, कांदा, लोणचे, पापड असा फक्कड बेत होता. गावाकडचं गूळ न घातलेलं वरण आणि भात काही खासंच होता. गावाला लागूनच असलेल्या एका सरकारी योजनेच्या रेस्ट हाऊसमध्ये आमची झोपण्याची व्यवस्था केलेली होती. सकाळच्या नाष्त्याची ऑर्डर देऊन आम्ही रेस्ट हाऊसवर आलो.

रेस्टहाऊसच्या कट्ट्यावर बरोबर आणलेल्या स्लीपिंग मॅट आणि ताडपत्र्या अंथरल्या आणि आडवे झालो. तेवढ्यात नितीनने गिटार काढले आणि ती शनिवारची रात्र एक अविस्मरणीय रात्र बनली. त्यानंतर जवळ जवळ चार-पास तास मोकळ्या आकाशाखाली मैफल रंगली होती. नितीन गिटार वाजवत होता. कधी मंदार कधी वर्षा तर कधी सर्वजण एकत्र गाण्यांमागून गाणी म्हणत होतो. रेस्ट हाऊस गावाबाहेर असल्याचा फायदा झालाच. "रुबरु रोशनी" गाण्याच्या वेळी सर्वांनी घेतलेला आलाप अजूनही तसाच ऐकू येतोय. दोन एक वाजता नितीनच्या बोटातल्या जादूला सलाम करून आम्ही झोपायला गेलो. काहीजण तिथेच कट्ट्यावर आडवे झाले. डोळ्याला डोळा लागतो ना लागतो तोच पावसाने वर्दी दिली. धडाधड सगळे धडपडत आत आलो आणि पत्र्यावर होणारा पावसाचा आवाज ऐकत थकलेल्या पायांकडे दुर्लक्ष करत झोपून गेलो.

सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात सकाळचे विधी उरकून घेतले. सकाळी दोन दोन प्लेटा पोह्यांचा फडशा पाडला. गावाच्या शेजारी महादेव मंदीर आहे आणि तिथेच एक बंधारा आहे. पुन्हा एकदा पाण्यात मनसोक्त डुंबून घेतले. महादेवाचे दर्शन घेतले तोपर्यंत सगळे तयार झालेच होते. सकाळचे ९ वाजले होते. दोन्ही बालेकिल्ले चढून जेवून पुन्हा पुण्याला ८ वाजायच्या आत परत येणे अशक्य वाटत होते. म्हणून फक्त मनरंजनला जाऊन यायचे ठरले. राजमाची गावातून मनरंजनला जायला फक्त १५-२० मिनिटे लागली. श्रीवर्धन आणि मनरंजनच्या बरोबर मध्ये पायथ्याशी भवानी मंदीर आहे. तेथून श्रीवर्धनला जायला वाट आहे. तसेच लोणावळ्याहून येणारी वाटही तिथेच मिळते. मनरंजनहून कर्नाळा, ढाकबहिरी, लोणावळा, नागफणी दिसते. उल्हास नदीचे खोरे पावसाळयात याहूनही सुंदर दिसत असणार असं वाटलं आणि पावसाळ्यात पुन्हा इथे यायचा बेत पक्का केला.

मनरंजनहून खाली आल्यावर जेवणात ट्रेकर्सचा नेहमीचा मेनू समोर होताच. पिठलं भाकरी कांदा पोटभर खाल्ल्यावर थोडावेळ तिथेच लुडकलो. भर दुपारी १ वाजता परत उतरायला सुरुवात केली. गावातल्या लोकांनी पठारावरच्या गणपतीच्या शेजारून उजवीकडची वाट घेतली तर लवकर कोंदिवड्यात पोहोचाल असे सांगितले. तेव्हा कोंदिवडे मार्गे कर्जतला पोहोचायचे असे ठरवले. पण ते इतक्या सहज होणार नव्हते. आदल्या रात्री अंधारात चालल्यामुळे राजमाची गावातून निघालेली वाट एका वळणावर चुकलो आणि भरकटलो. थोडा वेळ चालल्यावर ही मनरंजनला वळसा घालून लोणावळ्याला जाणारी वाट आहे हे लक्षात आले. पुन्हा माघारी फिरून त्या चुकलेल्या वळणावर दुसरी वाट पकडली. आता मात्र न चुकता पठारावरच्या गणपतीकडे सुखरूप आलो. तेथून कोंदिवड्याकडे जाणारे बाण दाखवले होते. दर पाच एक मिनिटांनी मोठ्या दगडांवर असे बाण होते. एका ठिकाणी मात्र बाणाचा दगड नव्हता आणि पायवाटही संपली होती.

जवळजवळ अर्धे अंतर उतरलो होतो. समोर दिसणार्‍या उल्हास नदीच्या दिशेने पाण्याच्या ओहोळातून खाली उतरत राहिलो. एका ठिकाणी ओहोळ अचानक संपला आणि खोल कडा लागला. वाट संपली. मग स्नेहल, मधुरा, सुप्रिया आणि मी वाट शोधण्याच्या मागे लागलो. तोपर्यंत सगळे एका पांढर्‍या झाडापाशी येऊन थांबले. या झाडाच्या मुळ्याही पांढर्‍या असतात. याला भुताचे झाड किंवा घोस्ट ट्री असे म्हणतात असे आमच्यापैकी कोणीतरी सांगितले. एका कोरड्या धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला चिंचोळी वाट होती. वाट किंचित अवघड होती पण पर्याय नव्हता. तिथून खाली उतरल्यावर धबधब्याकडे वळून पाहताना आत कोरलेली लेणी दिसली. आम्ही कोंडाण्याच्या लेण्याच्या अगदी जवळ होतो. पण वेळेअभावी सर्वाना काही तिकडे जाता आलं नाही. आधी उतरलेल्यांपैकी स्नेहल मात्र पटकन लेणी पाहून आला.

वाटेवर वाळलेल्या पानांचा खच पडला होता. त्यातच पाय देत, काटेकुटे बाजूला सारत आम्ही खाली उतरू लागलो. दिशा दाखवणारे बाण तर कधीच संपले होते. त्यातच एका ओहोळात होती ती पण पायवाट संपली. मग तसेच खाली उतरत राहिलो आणि अचानक मुंडवाडीत पोहोचलो. संध्याकाळचे पाच वाजले होते. कोंदिवड्यात लवकरात लवकर पोहोचायचे होते. पण उन्हाच्या तडाख्याने सगळे थकून गेले होते. हापशीवर पोटाला तडस लागेपर्यंत पाणी पिऊन सगळे तिथेच अर्धा तास आडवे झाले. नंतर मात्र मुंडवाडीतून कोंडाणे मार्गे कोंदिवड्याला जाणारी गाडीवाट पकडली. कोंदिवड्यात श्री गोगटेंकडे दोन सहा सीटर सांगितल्या. कर्जतकडे धावणार्‍या सहा सीटरमधून राजमाचीचा मनरंजन पहात होतो. दोन दिवसाचा ट्रेक एकदम धडाक्यात संपन्न होत होता.

Labels: ,