Monday, March 17, 2008

महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)

महर्षी ते गौरी पुस्तकात मंगला आठल्येकर महर्षी कर्वे, र. धों आणि गौरी देशपांडे या कर्व्यांच्या तीन पिढ्यांच्या स्त्री विषयक कार्याचा आढावा घेतात. खरेतर कर्व्यांच्या काळापुढचा विचार करण्याच्या वृत्तीचा ठाव घ्यायचा म्हणजे अवघड कार्य आहे. पण मंगला आठल्येकरांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललेले आहे हे पुस्तक वाचताना वारंवार जाणवते. आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना आणि पार्श्वभूमी मधून त्यांने १८५० नंतर समाजसुधारणेची चळवळ कशी फोफावत गेली याचा सर्वंकष मागोवा घेतलेला आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर एतद्देशीय तरुणांच्या मानसिकतेत झालेला बदल अधोरेखित करताना त्या म्हणतात की सगळं जग पुढारलेलं असताना मी मात्र अजूनही पापपुण्याच्या, धर्म-अधर्माच्या चुकीच्या कल्पनांना कवटाळून माझ्याच आई-बहीण, मुलीवर अन्याय करतो आहे ही जाणीव तरुणांनाही बंड करण्यास प्रवृत्त करु लागली आणि त्यातून बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा बंडखोर विचारवंतांची फळी निर्माण झाली.

महर्षी कर्व्यांच्या आयुष्यावर लहानपणी ऐकलेल्या विधवाविवाहाच्या बातमीचा तसेच जवळच्या नात्यातील स्त्रियांचा दु:खद जीवनाचा परिणाम ठळकपणे दिसून येतो. पुस्तकात महर्षी कर्व्यांचा विधवाविवाहाकडून विधवाशिक्षण आणि स्त्रीशिक्षणाकडे झालेला प्रवास त्यामागच्या हेतूसह सविस्तर मांडलेला आहे. स्त्रीच्या आयुष्यात पुनर्विवाहापेक्षा शिक्षणाचे महत्त्व जास्त आहे हे ओळखून कर्व्यांनी आपल्या पूर्वीच्या तत्त्वांशी तडजोड केली. प्रसंगी पुनर्विवाहाच्या कार्यात मदत करणार्‍यांचा विरोधही पत्करला. कर्व्यांच्या सामाजसुधारणेच्या कार्याशी आपली ओळख होत असतानाच लेखिकेने त्यांचे काही दोष ही सांगितले आहेत. वादग्रस्त मुद्द्यांवर ते न्याय्य बाजू न घेता तटस्थ रहात. 'रधों'वर समाज तुटून पडला असताना आणि त्यांच्या निस्पृह वृत्तीची जाणीव असतानाही कर्व्यांनी रधोंची बाजू घेतली नाही. किंबहुना रधोंची बाजू घेण्याने त्यांच्या शिक्षण संस्थेवर परिणाम होईल याची पूरेपूर माहिती असल्याने ते गप्प बसले. त्याचबरोबर जसे लोकविलक्षण कार्य करणारे सुधारक कुटुंबियाच्या वाट्याला फारसे येत नाहीत तसे महर्षी कधी त्यांच्या बायकोमुलांच्या वाट्याला आले नाहीत.

रघुनाथ म्हणजेच 'रधों'चे बालपण कोकणातल्या घरांत सोळा सोळा मुले असलेली कुटुंबे पाहत दारिद्रयात गेले. त्यामुळे देशहितासाठी म्हणून नव्हे तर कमीत कमी वैयक्तिक हितासाठी तरी संततीनियमन करावे असे त्यांचे मत होते. गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले तरी परदेशात वास्तव्य केल्याने लैंगिक स्वातंत्र्याविषयी झालेल्या वाचनाचा प्रभाव त्यांच्या संततीनियमनाच्या प्रसारात दिसून येतो. फ्रान्समधून परत आल्यावर प्रोफेसर म्हणून नोकरी करत असतानाच संततीनियमनाची साधने विकण्यास सुरुवात केली. ख्रिश्चन धर्मात असलेल्या संततीनियमन विरोधामुळे त्यांना विल्सन कॉलेजची नोकरी सोडावी लागली. आर्थिक ओढाताण होत असतानाही १९२३ साली मराठीतलं 'संततीनियमन' हे या विषयावरचं पहिलं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं. जुलै १९२७ मध्ये त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी 'समाजस्वास्थ्य' हे मासिक चालवलं. रधोंने स्वत:बद्दल फार लिहिले नसले तरे 'समाजस्वास्थ्य'चे अंक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा होता. पुढच्या महिन्याचा अंक आधी काढून ठेवण्याच्या शिस्तीमुळे मृत्युनंतरही एक महिन्याचा 'समाजस्वास्थ्य'चा अंक वर्गणीदारांकाडे पोहोचला होता. लोकांना अडाणीपणातून बाहेर काढण्यासाठी आपण संततीनियमनाची शास्त्रीय माहिती देण्यास तयार असता लोकांने खुळचट धार्मिक कल्पनांचा बाऊ करावा याचे रधोंना वैषम्य वाटे. लेखिकेच्या मते रधोंसारख्या विलक्षण बुद्धिप्रामाण्यवादी आणि तर्कशुद्ध विचारवंताच्या संततीनियमन, समागमस्वातंत्र्य, श्लील-अश्लीलता, विवाहसंस्था, व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचारांची आजच्या ही पिढीला ओळख नसणे हे दुर्दैव आहे. अत्यंत तर्कशुद्ध विचार असल्याने त्यांच्या आयुष्यात विसंगती फार कमी होत्या. समाजाच्या रुढीप्रियतेवर कडाडून प्रहार केल्यामुळे म्हणा वा लैंगिक स्वातंत्र्यासारख्या समाजाच्या दृष्टीने अनिर्मळ विषयावर विचार प्रकट केल्याने रधोंच्या वाट्याला जी उपेक्षा आली तीच आजच्या पिढीला ते माहीत नसण्यातून प्रतीत होत आहे. लेखिकेच्या मते आजच्या काळातही रधोंचे विचार जर धक्कादायक, नवीन आणि पुरोगामी वाटत असतील तर याचा अर्थ आपल्या समाजाचे विचार नीती-अनीतीच्या, धर्म-अधर्माच्या पारंपारिक कल्पनांना सोडून पुढे गेलेले नाहीत.

पुस्तकाच्या सुरुवातीला लेखिका महर्षी आणि रधोंच्या बरोबर या पुस्तकात गौरी देशपांडेंचा समावेश का केला याचा खुलासा करतात. 'साहित्य' या माध्यमाद्वारे स्त्रीच्या जगण्याचा विचार गौरी आपल्या लेखनातून मांडतात. वैचारिक लेख लिहून रधोंनी 'समाजस्वास्थ्या'तून जे सांगितलं तेच गौरींनी आपल्या कथा-कादंबर्यांतून काल्पनिक जग निर्माण करून सांगितलं. व्यक्तिरेखा काल्पनिक असल्या तरी त्यांचे प्रश्न वास्तव आहेत. त्यांच्या कथांतील स्त्रिया विवाहित असतात आणि नवरा, मुलगा यांवर प्रेम करत असतानाही आपल्या मनाच्या हाकेकडे त्या दुर्लक्ष करत नाहीत. रधोंप्रमाणेच गौरी देशपांड्यांनाही नीती-अनीतीची पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी चौकट मंजूर नाही. शेवटी लेखिका म्हणते की गौरी देशपांड्यांचे सारे लेखन स्त्रीच्याच नव्हे तर स्त्रीच्या आणि त्यायोगे पुरुषाच्या जीवनात येऊ शकणार्‍या समस्यांचा विचार आहे. हा तोडगा नसून तोडग्याच्या दिशेने व्यक्तिस्वातंत्र्याचा हात धरुन केलेली वाटचाल आहे.

पुस्तकाच्या शेवटी दिलेली गौरी देशपांड्यांची मुलाखत वाचनीय आहे. महर्षी तसेच रधों बरोबरच त्यांच्या स्वत:च्या कादंबर्‍यांवर विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे त्यांनी दिली आहेत. त्याचबरोबर परखड प्रश्न विचारण्याचे लेखिकेचे कसब वाखाणण्यासारखे आहे. गौरी देशपांड्यांचे साहित्य ज्यांनी वाचलेले नाही त्यांना पुस्तकातील गौरी देशपांडे प्रकरण थोडे रुक्ष वाटण्याचा संभव आहे. रधों, कर्व्यांच्या एखाद्या विषयावरील मतांबरोबरच लेखिकेने केलेले विवेचनही तितकेच तोडीचे आहे. रधों, महर्षी कर्वे तसेच गौरींची अवतरणे संदर्भासहीत देऊन लेखिकेने कसल्याही शंकेस वाव ठेवलेला नाही. विधवाविवाह, विधवाशिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, संततीनियमन, समागम स्वातंत्र्य, विवाहसंस्था, व्यक्तिस्वातंत्र्य अशा स्त्रीशी निगडीत प्रश्नांचा कृतिशील पाठपुरावा करण्यार्‍या कर्वे कुटुंबियाचा परिचय होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच संग्रही असावे.

महर्षी ते गौरी
(स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल)
मंगला आठल्येकर
राजहंस प्रकाशन.


अभिजित